अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असलेली राणी एलिझाबेथची कन्या – प्रिन्सेस अॅन

princess
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांना चार अपत्ये असून, प्रिन्स चार्ल्स हे सर्वात थोरले आहेत. त्यानंतर अनुक्रमे प्रिन्सेस अॅन, प्रिन्स अँड्र्यू, आणि प्रिन्स एडवर्ड अशी एलिझाबेथची चार अपत्ये आहेत. प्रिन्सेस अॅनला ‘प्रिन्सेस रॉयल’ म्हणूनही ओळखले जाते. किंबहुना ही त्यांची उपाधी आहे. प्रिन्सेस अॅनचा जन्म १५ ऑगस्ट १९५० साली झाला. तिच्या जन्माबरोबर ब्रिटनच्या सिंहासनावर हक्क सांगणारी ती प्रिन्स चार्ल्स नंतर दुसऱ्या क्रमांकाची वारस होती. आता प्रिन्स विलियमच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर अॅन तेराव्या स्थानावर पोहोचली आहे. याचे कारण म्हणजे ब्रिटनमध्ये अस्तित्वात असलेल्या शाही परिवाराच्या कायद्यांनुसार अॅनचे स्थान तिचे भाऊ आणि त्यांच्या अपत्यांच्या नंतर आहे.
princess1
अॅनच्या जन्मानंतर तिला ‘प्रिन्सेस’ ही उपाधी देण्यात आली. तसेच १९८७ साली राणी एलिझाबेथ हिने अॅनला ‘प्रिन्सेस रॉयल’ अशी उपाधी प्रदान केली. चार्ल्सचे पुत्र राजकुमार विलियम ब्रिटनचे राजे बनल्यानंतर विलियमची मुलगी शार्लोट हिला ‘प्रिन्सेस रॉयल’ ही उपाधी तिला देण्यात येईल. पण तत्पूर्वी प्रिन्सेस अॅनचे निधन झाले असेल, तरच ही उपाधी शार्लोटला देण्यात येईल. पण प्रिन्सेस अॅन जिवंत असेपर्यंत ही उपाधी त्यांच्याकडच राहील.
princess2
प्रिन्सेस अॅन यांचा विवाह सर टिमोथी लॉरेन्स यांच्याशी झाला असून, हा विवाह १९९२ साली खासगी समारंभामध्ये पार पडला. हा प्रिन्सेस अॅनचा दुसरा विवाह असून, तत्पूर्वी त्यांचा विवाह कॅप्टन मार्क फिलिप्स यांच्याशी झाला होता. पहिल्या विवाहापासून अॅनला, मार्क फिलिप्स आणि झारा टींडल ही दोन अपत्ये आहेत. अॅनला आता चार नातवंडे देखील आहेत. प्रिन्सेस अॅन यांनी वयाच्या अठराव्या वर्षी सामाजिक आणि राजनैतिक जबाबदारी उचलली. आज वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही राणी एलीझाबेथच्या राजनैतिक प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत आहेत. किंबहुना शाही परिवार सहभागी होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये सर्वात जास्त उपस्थिती प्रिन्सेस अॅन यांचीच असते. वर्षभरामध्ये तीनशे निरनिराळ्या धर्मादाय संस्था आयोजित करीत असलेल्या कार्यक्रमांना त्या हजेरी लावीत असून, वर्षातील सुमारे १८० दिवस शाही कार्यक्रमांच्या निमित्ताने अॅन व्यस्त असतात.
princess3
राणी एलिझाबेथ प्रमाणेच प्रिन्सेस अॅन यांना देखील घोडदौडीची अत्यंत आवड असून त्यामध्ये त्या निष्णात आहेत. १९७६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला होता. तसेच इतर अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी पुरस्कारही जिंकले आहेत. त्यांचा हा वारसा त्यांची मुलगी झारा पुढे चालवीत असून, झाराने घोडदौडीमध्ये अनेक सन्मान मिळविले आहेत. अॅन ब्रिटीश ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्याही आहेत.

Leave a Comment