काजव्यांच्या प्रकाशाने उजळलेला ‘ग्लो वर्म टनेल’

tunnel
ऑस्ट्रेलियातील हेलेन्सबर्ग येथील बोगद्यातून एके काळी रेल्वेची वाहतूक होत असे. पण आता नवनवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात आल्यानंतर हा रेल्वे मार्ग वापरात नाही. येथे कोणाचे फारसे येणे जाणे नसल्यामुळे लवकरच वृक्षपर्णींच्या खाली हा बोगदा दडून गेला. पण या वृक्षपर्णीचा पडदा हटवून एकदा का या बोगद्यामध्ये प्रवेश केला, की समोरचे दृश्य एखाद्याला भान विसरावयास लावणारे असते. हा बोगदा गेली अनेक वर्षे वापरात नसल्यामुळे या बोगद्यामध्ये विद्युत प्रकाशयोजना अर्थातच नाही. मात्र हा बोगदा उजळण्याची कामगिरी निसर्गानेच येथे करून ठेवली असून, हीच येथील खासियत समाजली जाते. हा बोगदा हजारो काजव्यांच्या मंद प्रकाशाने उजळलेला असतो.
tunnel1
मेट्रोपोलिटन टनेल या नावाने ओळखला जाणारा हा बोगदा १८८०च्या काळामध्ये बांधण्यात आला होता. पण त्यांनतर याचा वापर फार काळ झाला नाही. बांधून तयार करण्याच्या काही काळानन्तर, म्हणजे १९२५ सालच्या सुमारास इंजिनांच्या धुराच्या काजळीने काळवंडलेल्या या बोगद्याचा वापर बंद करण्यात आला. या बोगद्यामध्ये सतत भरून राहणाऱ्या धुरामुळे येथून रेल्वेप्रवासास अडचण होऊ लागल्याकारणाने हा बोगदा वापरण्यास बंदी करण्यात आली. बोगद्याचा वापर कोणाला करता येऊ नये या साठी बोगद्याच्या एका बाजूला भिंत उभारण्यात आली. गेली अनेक वर्षे येथे फारसे कोणी आले नसल्याने किंवा या बोगद्याच्या आसपासच्या परिसराचा रखरखाव झाला नसल्याने या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला प्रचंड रान माजले.
tunnel2
१९९५ साली या बोगद्याच्या परिसराच्या सफाईचे काम हाती घेण्यात आल्यानंतर हजारो काजव्यांच्या (ग्लो वर्म्स) प्रकाशाने हा बोगदा निळसर प्रकाशाने उजळला असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा काजव्यांनी उजळलेला बोगदा पाहण्यासाठी पर्यटक मुद्दाम या ठिकाणी येत असतात. पावसाळ्यामध्ये या बोगद्यामध्ये पाणी भरते, बोगद्याच्या वरून पाण्याचे लहान मोठे धबधबे बोगद्यामध्ये येत असतात, बोगद्यामध्ये पायी शिरणे अश्यक्य होऊन बसते, तश्या परिस्थितीमध्येही पर्यटक लहान लहान होड्या घेऊन हा काजव्यांच्या प्रकाशाने उजळलेला ‘ग्लो वर्म टनेल’ पाहण्यासाठी आवर्जून येत असतात.

Leave a Comment