जोधपुरच्या राजघराण्याची शान – उमेद भवन पॅलेस

umaid
आजतागायत हयात असलेली राजघराणी, त्यांचे प्रशस्त किल्ले, आलिशान महाल आणि वैभव हे आजच्या काळामध्येही भारतामध्ये पहायचे असेल, तर याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे राजस्थानची सफर. गेली अनेक शतके राजपूत वीरांची सत्ता असलेला हा प्रांत. एखाद्या माळेतील रत्ने सर्वत्र विखुरावीत अश्या तऱ्हेने राजस्थानच्या उष्ण प्रदेशामध्ये ठिकठीकाणी किल्ले, राजवाडे पहावयास मिळतात. राजस्थान मधील अनेक सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक आहे जोधपुर आणि येथे असलेला भव्य मेहरानगड फोर्ट वास्तुकेलाचा अप्रतिम नमुना आहे. त्याचबरोबर दिमाखात उभे आहे, आजतागायत जोधपुरच्या राजघराण्याचे औपचारिक निवासस्थान असलेले आणि या निवासस्थानाचा काही भाग आलिशान हॉटेलमध्ये रूपांतरित केले गेलेले उमेद भवन पॅलेस. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाहसमारंभ काही काळापूर्वीच उमेद भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
umaid1
राजस्थानमधील इतर ऐतिहासिक वास्तू पाहता, उमेद भवनचे निर्माण हे अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच १९२८ ते १९४३ या काळामध्ये करविण्यात आले. या काळामध्ये राजस्थानमधील लहान लहान राज्यांचे बहुतेक सर्वच राजे आपापल्या संस्थानांमध्ये मोठमोठे राजवाडे निर्माण करवीत असल्याने त्यांच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट राजवाडा कोणाचा अशी जणू स्पर्धाच सुरु होती. या काळामध्ये ब्रिटीश राजवटीअंतर्गत या लहान लहान राज्यांच्या सत्ताधीशांशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न ब्रिटिशांनी केले, जेणेकरून त्यांचा पूर्ण पाठींबा ब्रिटिशांना मिळावा. या अंतर्गत राजघराण्यातील सदस्यांना ब्रिटीश राजवटीच्या रीतीरीवाजांमध्ये समाविष्ट केले जाऊन, त्यांना युरोपियन विचारसरणी, परंपरा आणि त्याच धाटणीवर शिक्षण देण्याचे काम सुरु झाले.
ब्रिटीश विचारसरणी आणि जीवनशैलीची छाप या राजघराण्यातील सदस्यांच्या जीवनशैली, पेहरावावर पडू लागली. तसेच ब्रिटीश राजवटीच्या छत्राखाली हे राजवंश असल्याने त्यांनी बनवविलेल्या वास्तूंवरही ब्रिटीशांची छाप दिसणे स्वाभाविक होते. या काळी बनविलेल्या वास्तू आलिशान, अतिशय भव्य होत्या. यांचे बांधकाम स्थानिक लोकांकडून करविले गेले असले, तरी धाटणी मात्र युरोपियन होती. तसेच या महालांमध्ये असलेल्या शोभेच्या वस्तूंपासून ते फर्निचरपर्यंत सर्वांवरच युरोपियन छाप होती. उमेद भवन सुमारे २६ एकरच्या परिसरामध्ये विस्तारलेले असून, सोनेरी रंगाचा सँडस्टोन वापरून या महालाचे निर्माण करविण्यात आले आहे. त्याकाळी जोधपुरमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. लोकांकडे कमाईचे साधन नव्हते. तेव्हा लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तात्कालिन शासनकर्ते महाराजा उमेद सिंह यांनी या महालाचे निर्माणकार्य हाती घेतले. त्यांच्याच नावाने हा महाल ओळखला जातो.
umaid2
१९२८ साली उमेद भवनची पायाभरणी झाली. आणि १९४३ साली याचे निर्माणकार्य पूर्ण झाले. ब्रिटीश स्थापत्यविशारद हेन्री वॉघन यांनी या महालाची रचना कशी असावी याचे डिझाईन तयार केले असल्याने राजपूत आणि ब्रिटीश वास्तूशैलीचा प्रभाव उमेद भवनवर पहावयास मिळतो. या महालामध्ये मकराना संगमरवराचा वापर सढळ हाताने करण्यात आला आहे. संगमरवराचे संपूर्ण काम स्थानिक कारागिरांनी केलेले आहे. या महालामध्ये ३४७ कक्ष असून, येथे असणारे पडदे, गालिचे, आणि पुष्कळसे फर्निचर युरोपमधून आणविण्यात आले आहे. या महालामध्ये सर्वत्र भव्य भित्तीचित्रेही पाहायला मिळतात. असे हे उमेद भवन पूर्ण तयार झाल्यानंतर अवघ्या चारच वर्षांमध्ये महाराज उमेद सिंह यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर गादीवर आलेले महाराज हनवंत सिंह यांचे देखील वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांचे सुपुत्र महाराज गज सिंह आणि त्यांचे वंशज आता हयात असून, आजतागायत त्यांचा निवास उमेद भवन येथे आहे.

Leave a Comment