भोजनामध्ये ऑइस्टर खात असताना सापडला हजारो डॉलर्स मूल्याचा मोती

oyster
न्यूजर्सीचा निवासी असणारा रिक अँटॉश, न्यूयॉर्क शहरामधील सुप्रसिद्ध ग्रँड सेन्ट्रल ऑइस्टर बार येथे दुपारचे भोजन घेत होता. भोजनासाठी त्याने त्याच्या आवडीचे ‘ऑइस्टर पॅन रोस्ट’ मागविले होते. आपल्या आवडीच्या मद्यासोबत भोजनाचा आस्वाद घेत असताना अचानक रिकच्या दातांखाली मोठा टणक तुकडा आला. आपला दात तुटला असावा, किंवा दातातले ‘फिलिंग’ निघाले असावे या चिंतेने रिकच्या मनामध्ये त्वरित घर केले. दातांखाली आलेला तुकडा नेमका आहे तरी कशाचा हे पाहण्यासाठी रिकने हा तुकडा तोंडामधून बाहेर काढला खरा, आणि त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
oyster1
रिकच्या दातांखाली आलेला हा तुकडा त्याच्या दाताचा किंवा दातांतील ‘फिलिंग’ चा नसून, हा चक्क एक बहुमूल्य नैसर्गिक मोती होता. रिक खात असलेल्या शिंपल्याप्रमाणे दिसणाऱ्या ऑइस्टरमधून हा मोती निघाला होता. त्यानंतर रीक ने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तो देखील अचंबित झाला. या पूर्वी असा प्रकार रेस्टॉरंटमध्ये कधीच घडला नसल्याचे त्याने म्हटले. हा एकंदर प्रकार अतिशय आश्चर्यजनक असून, रिक नशीबवान असल्याचे व्यवस्थापकाचे म्हणणे आहे.
oyster2
रिकला त्याच्या भोजनामध्ये सापडलेल्या मोत्याचे नेमके मूल्य अजून ठरविण्यात आले नसले, तरी तज्ञांच्या मतानुसार या मोत्याचे मूल्य चार ते साडेचार हजार डॉलर्सपर्यंत असावे. रिकने ऑर्डर केलेल्या पदार्थाची किंमत चौदा डॉलर्स होती. यामध्ये चार हजार डॉलर्स मूल्याचा मोती सापडल्याने रिकचे नशीब चांगलेच फळले आहे. आजवर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये घेतलेल्या भोजनामध्ये हे ऑइस्टरचे भोजन आपले सर्वाधिक आवडते भोजन असल्याचे रिक म्हणतो.

Leave a Comment