स्टालिनग्राड येथे सापडली दोन हजार जर्मन सैनिकांचे अवशेष असलेली दफनभूमी

german
वोल्गोग्राड ( पूर्वीचे स्टालिनग्राड ) येथे नवी पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी खोदकाम सुरु असताना कर्मचाऱ्यांना असे काही सापडले, जे पाहून तिथे असलेले सर्वच लोक अचंबित झाले. या ठिकाणी खोदकाम करीत असताना अचानक शोध लागला तो अनेक दशकांपूर्वी येथे बनविल्या गेलेल्या दफनभूमीचा. या दफनभूमीमध्ये अनेक जर्मन सैनिक आणि त्यांच्या घोड्यांचे अवशेष सापडले आहेत. युद्धाच्या दरम्यान मरण पावलेल्या सैनिकांना दफन करण्यासाठी अश्या प्रकारच्या ‘मास ग्रेव्ह्ज’ बनविल्या जात असत. या प्रचंड मोठ्या कबरीमध्ये एकाच वेळी अनेक सैनिकांचे मृतदेह दफन केले जात असत. अश्याच प्रकारची ‘मास ग्रेव्ह’ किंवा दफनभूमी या ठिकाणी असल्याचा शोध सुमारे दोन महिन्यांपूर्वी लागला.
german1
या वर्षीच्या सुरुवातीला जेव्हा ही दफनभूमी येथे असल्याचा शोध लागला त्यावेळी सुरुवातीला आठशे सैनिकांचे अवशेष या ठिकाणी सापडले होते. हे अवशेष सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर पुरातत्ववेत्त्यांच्या निगराणीखाली या ठिकाणी आणखी अवशेष मिळतात किंवा नाही हे पाहण्यासाठी खोदकाम सुरु ठेवण्यात आले. जसजसे खोदकाम सुरु राहिले, तसतसे अधिकाधिक अवशेष सापडू लागले. पाहता पाहता सुमारे १९०० सैनिकांचे अवशेष पुरातत्ववेत्त्यांना सापडले असून, आणखी अवशेष सापडतात किंवा नाही याची पाहणी सुरु आहे.
german2
या शहरामध्ये अश्या प्रकारच्या ‘मास ग्रेव्ह्ज’ सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्टालिनग्राड हे शहर दुसऱ्या महायुद्धातील संघर्षाने सर्वाधिक प्रभावित झालेले शहर होते. त्यामुळे त्या काळी युद्धामध्ये कामी आलेल्या सैनिकांना अश्या प्रकारच्या ‘मास ग्रेव्ह्ज’मध्ये दफन केले जात असे. या शहर आणि परिसरामध्ये अश्या प्रकारच्या अनेक दफनभूमी आहेत, ज्यामध्ये जर्मन आणि रशियन सैनिकांचे मृतदेह दफन केले गेले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मन फील्ड मार्शल फ्रीडरिश पाउलूस यांनी हिटलरची आज्ञा डावलून रशियन सेनेपुढे शरणागती पत्करली, पण तत्पूर्वी स्टालिनग्राड मधे लाखो सैनिक मारले गेले होते.
german3
युद्धामध्ये स्टालिनग्राड शहराचे भयंकर नुकसान झाले. युद्धामध्ये कामी आलेल्यांचे मृतदेह तसेच राहिले, तर त्यातून भयंकर रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी अनेक ‘मास ग्रेव्ह्ज’ तयार करण्यात आल्या. या दफनभूमीमध्ये सैनिकांचे आणि त्यांच्या घोड्यांचे मृतदेह एकत्रितपणे दफन केले गेले. सैनिकांच्या मृतदेहांच्या सोबत त्यांच्या पाण्याच्या बाटल्या, किल्ल्या इत्यादी वस्तू, व हत्यारे देखील दफन केल्या गेल्या होत्या. या अवशेषांच्या सोबत अनेक ओळखपत्रे ही सापडली आहेत.

Leave a Comment