अहिल्याबाई होळकरांचे ‘महेश्वर’

fort
महेश्वर हे गाव भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये असून, इंदूर शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. होळकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठा साम्राज्याची, महेश्वर राजधानी होती. अठराव्या शतकाच्या शेवटी महेश्वर अहिल्याबाई होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आले. अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासामध्ये अतिशय कुशल शासनकर्त्या म्हणून घेतले जाते. अगदी लहान वयामध्ये वैधव्याचा आघात सहन केलेल्या अहिल्याबाई, मल्हारराव होळकर यांच्या स्नुषा होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या नजरेखाली महेश्वरच्या राज्यकारभाराची धुरा सांभाळली. अहिल्याबाईंचे निवासस्थान असलेला वाडा साधाच पण प्रशस्त होता. येथूनच सर्व राज्याची व्यवस्था त्या पाहत असत. अहिल्याबाईंच्या वाड्यातील यांचे खासगी मंदिर ही होळकर वाड्याची खासियत. या मंदिरामध्ये अनेक सोन्या-चांदीच्या देवदेवतांच्या प्रतिमा असत. आताच्या काळामध्ये या भव्य वाड्याचे रूपांतर हेरीटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.
fort1
अहिल्या बाईंच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचे केंद्र म्हणून नावारूपाला आले. या ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण करविले. त्याचबरोबर वाराणसी येथील काशी विश्वेश्वराचे मंदिरचेही निर्माण अहिल्याबाईनी करविले होते. दक्षिण आणि उत्तर भारताशी चांगल्या प्रकारे जोडले गेले असल्याने महेश्वर त्या काळी मोठी बाजरपेठ म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंवर मुघल, राजपूत आणि मराठा वास्तुशैलीचे प्रभाव पाहण्यास मिळतात. त्यावरूनच येथे किती प्रकारच्या संस्कृती एकत्र नांदत असतील, याचा अंदाज आपल्याला येतो.
fort2
अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वरची मुख्य आणि अतिशय प्रसिद्ध खासियत म्हणजे येथील महेश्वरी साड्या. या साड्यांना आजच्या काळामध्ये केवळ भारतामध्ये नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील मोठी मागणी आहे. अहिल्याबाईंनी महाराष्ट्रातून खास कारागिर ( साड्या विणणारे विणकर) महेश्वर येथे बोलावून घेतले आणि त्या काळी मराठी स्त्रिया परिधान करीत असलेल्या नऊवारी साड्या विणण्यासाठी त्यांना हातमाग उपलब्ध करवून दिले. कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती भारतभर पसरली. आजही या साड्या येथील खासियत असून, आताच्या काळामध्ये या साड्या विणण्याचे काम मुख्यत्वे महिलांच्या द्वारे केले जात असते.

Leave a Comment