प्राचीन वास्तुकेलचा अप्रतिम नमुना- हाळेबीडू येथील होयसाळेश्वर मंदिर.

temple
कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यामध्ये हाळेबीडू नामक गाव जरी फार मोठे नसले, तरी दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये या गावाला अनन्यसाधारण महत्व आहे. हे ठिकाण एके काळी होयसाळा वंशाची राजधानी म्हणून नावारूपाला आले होते. आजच्या काळामध्ये अस्तित्वात असलेला कर्नाटक राज्याचा बहुतेक प्रदेश आणि आंध्र प्रदेश व तमिळ नाडू या राज्यांचा काही प्रदेश एके काळी होयसाळा वंशाच्या अधिपत्याखाली होता. अकराव्या ते चौदाव्या शतकाच्या काळा दरम्यान होयसाळा वंश येथे राज्य करीत होता. होयसाळा साम्राज्य अतिशय वैभवशाली असून, त्या वैभवाची साक्ष देणारे हाळेबीडू येथील होयसाळेश्वर मंदिर तत्कालीन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना म्हणता येईल.
temple1
नजर ठरणार नाही इतके सुंदर कोरीवकाम केलेली शिल्पे, आणि मंदिर घडविण्यासाठी वापरलेला गेलेला गडद रंगाचा पाषाण, ही या मंदिराची खासियत आहे. होयसाळा साम्राज्याच्या राजधानीला एके काळी ‘द्वारसमुद्र’ नावाने ओळखले जात असे. या राजधानीवर दोन वेळा परकीय सत्तांकडून आक्रमणे झाली. चौदाव्या शतकामध्ये दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी याच्या हुकुमावरून, त्याचा सरसेनापती मलिक गफूर याने आक्रमण केल्यानंतर होयसाळा वंशाच्या राज्यकर्त्यांनी राजधानीचा त्याग केला. त्यानंतर ‘द्वारसमुद्र’ ही राजधानी ‘हाळेबीडू’ म्हणजेच प्राचीन नगर, या नावाने ओळखली जाऊ लागली. या प्राचीन नगरीच्या एके काळच्या संपन्नतेची साक्ष देणाऱ्या होयसाळेश्वर मंदिराचे सौंदर्य आजही कायम आहे.
temple2
होयसाळेश्वराचे हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, या मंदिराचे निर्माण राजा विष्णूवर्धन यांनी ११२० ते ११५० या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये करविले. हे मंदिर शिवाला समर्पित असले, तरी वैष्णव धर्माला समर्पित अनेक शिल्पे या मंदिरामध्ये पहावयास मिळतात. या मंदिराच्या संकुलामध्ये अनेक लहान मोठी इतर मंदिरे असून, या सर्व मंदिरांमध्ये हवेचा संचार आणि उजेड राहण्यासाठी जाळीदार खिडक्या देखील बनविण्यात आल्या आहेत. कालांतराने राजा विष्णूवर्धन यांनी जैन धर्माचा स्वीकार केला असला, तरी हे मंदिर मात्र भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिराच्या प्रांगणामध्ये एकाच शिळेतून कोरलेले नंदीचे भव्य शिल्प आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारांपाशी द्वारपालांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराची खासियत आहेत, येथील चकाकणारे पाषाण स्तंभ. त्या काळामध्ये देखील पाषाणाला ‘पॉलीशिंग’ करण्याची कला कारीगरांना अवगत असल्याचे उदाहरण असणारे हे स्तंभ आहेत.
temple3
मंदिराच्या भिंतीवर सर्वत्र गायक, नर्तक, वादक इत्यादी कलाकारांची सुंदर शिल्पे असून, पौराणिक कथांमधील अनके पात्रे, प्राणी, पक्षी, यांचीही सुंदर शिल्पे या ठिकाणी पहावयास मिळतात. समुद्रमंथनासारख्या पौराणिक कथा शिल्परूपामध्ये या ठिकाणी पहावयास मिळतात. हाळेबीडू या ठिकाणी असलेले होयसाळेश्वर मंदिर हसन शहरापासून तीस किलोमीटर, आणि बेंगळूरू शहरापासून २१० किलोमीटर अंतरावर आहे.

Leave a Comment