व्हिएतनाममध्ये सध्या लोकप्रिय होत आहे अजब ‘फायर ब्युटी थेरपी’

fire
आपण सर्वात सुंदर दिसावे, आपल्या कडे इतरांचे लक्ष आकृष्ट व्हावे, असे कोणाला वाटत नाही? काही लोक यासाठी नित्य नव्या ब्युटी ट्रीटमेंटस्, नित्य नवी सौंदर्यप्रसाधने आजमावीत असतात. केवळ सुंदर दिसण्याच्या आग्रहाखातर धोकादायक ठरू शकणाऱ्या ब्युटी थेरपीज वापरताना देखील लोक मागेपुढे पाहत नाहीत. सध्या व्हियेतनाम मध्ये देखील सुंदर दिसण्यासाठी एक नवी, पण विचित्र ब्युटी ट्रीटमेंट लोकप्रिय होत आहे. आपली त्वचा सुंदर, नितळ आणि चमकदार व्हावी या करिता व्हियेतनामी लोक सध्या ‘फायर ब्युटी थेरपी’ आजमावत आहेत. व्हियेतनाम मधील अनेक प्रसिद्ध ब्युटी पार्लर्समध्ये ही थेरपी करण्यात येत असून, यासाठी ही थेरपी करवून घेण्यासाठी लोक गर्दी करीत असल्याचे समजते.
fire1
फायर ब्युटी थेरपीमध्ये चेहऱ्यावर एक टॉवेल ठेऊन यावर आगीचे निखारे ठेवले जातात. हा जळता टॉवेल काही सेकंदांच्या अवधीसाठी चेहऱ्यावर ठेवला जातो. ही थेरपी करणाऱ्या तज्ञांच्या मते या थेरपीमुळे त्वचेचे सौंदर्य वाढतेच, आपण त्याशिवाय डोकेदुखी, अनिद्रा, अंगदुखी यांसारख्या समस्यांवरही ही थेरपी गुणकारी असल्याचे समजते. या थेरपीमुळे पचनतंत्र सुरळीत राहते. सध्या सोशल मिडीयावर या ब्युटी थेरपीचे व्हिडियो व्हायरल होत असून, यावर येणाऱ्या प्रतिक्रियांवरून लोकांमध्ये ही थेरपी अतिशय लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे.
fire2
ही थेरपी करण्यासाठी एका खास पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये एका टॉवेलवर अल्कोहोल शिंपडून या टॉवेलने चेहरा संपूर्णपणे झाकला जातो. तसेच या टॉवेलवरील निखाऱ्यामुळे चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी देखील आवश्यक ती काळजी घेतली जात असून, या थेरपीमुळे कोणाच्या चेहऱ्याला इजा झाल्याचे आजवर ऐकिवात आलेले नाही. या थेरपीमुळे चेहऱ्यावरील कोशिका सक्रीय होत असून, त्यामुळे त्वचेचे सौंदर्य वाढते. या थेरपीमुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होत असून, ही थेरपी चेहऱ्यासोबतच शरीरावर इतरत्रही केली जाऊ शकते. ही थेरपी प्रशिक्षित तज्ञांच्या द्वारे केली जात असल्याने यामधून कोणत्याही प्रकारचे नुकसान संभवत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment