उत्तराखंड राज्यातील सियंजी गावातील अनोखी परंपरा

corn
भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये असणारी सियंजी आणि भाटोली नामक गावे अनेक रंगांची विविधता ल्यायलेली आहेत. या गावांमध्ये असलेली परंपरा आगळी वेगळी आहे. या गावातील प्रत्येक घरावर मक्याच्या कणसांची तोरणे आहेत. सियंजी हे गाव मसुरी या प्रसिद्ध हिल स्टेशनपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. या गावातील लोकांच्या जीवनामध्ये मक्याचे स्थान महत्वाचे आहे. गावामध्ये होत असणाऱ्या पिकांमध्ये मक्याचे पीक हे मुख्य आहे. गावातील बहुतेक शेतकरी मक्याची शेती करीत असून, मक्याची भाकरी (मक्की की रोटी) आणि अक्रोडांची चटणी हे येथील स्थानिक भोजन आहे.
corn1
मक्याची कणसे शेतातून तोडून आणल्यानंतर त्यातील काही कणसे घराच्या भोवती उंचावर टांगून ठेवली जातात. ही कणसे वाळवून त्या दाण्यांचा उपयोग पुढील पेरणीसाठी केला जातो. पण त्या शिवाय अश्या प्रकारे टांगलेली कणसे गावकऱ्यांसाठी सन्मानाचे, अभिमानाचे प्रतीक समजली जातात. किंबहुना जितकी जास्त कणसे घराच्या अवती भोवती टांगलेली असतील, तितकी त्या घरामध्ये जास्त सुबत्ता नांदते असे येथील गावकरी मानतात.
corn2
एकूण पंधरा घरांची वस्ती असलेले हे लहानसे गाव अतिशय स्वच्छ असून, मेहनतीने घर चालविण्याचे, घरासाठी पैसा कमावण्याचे काम येथील महिला करतात. शेतांमध्ये काम करीत असतानाच बिडी किंवा हुक्का पिणे हा ही या महिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. येथील घरे देवदार लाकडाचा वापर करून बनविलेली असून, घराचे मुख्य प्रवेशद्वार अगदी लहानसेच असते. चोरांना सहजासहजी घरामध्ये शिरता येऊ नये या साठी ही दारे अतिशय कमी उंची असलेली बनविण्यात येतात. या गावामध्ये ‘गढवाल इंग्लिश मिडीयम स्कूल’ नामक एकमेव शाळा असून, पंधरा विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.

Leave a Comment