भारतातील या रेल्वे स्थानकांची खासियत असलेले पदार्थ अवश्य चाखून पहा

food
जर मुंबईजवळील कर्जतच्या रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या वडा-पावाचा आस्वाद घेतला नाही, तर त्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये काही तरी राहून गेल्यासारखे वाटते. वडा-पाव हे संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते फास्ट फूड असले, तरी कर्जत रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या वडा-पावाची चवच न्यारी असे अस्सल खवय्यांचे मत आहे. ज्याप्रमाणे येथे लाजवाब वडा-पाव मिळणाऱ्या अनेक ठिकाणांमध्ये कर्जत रेल्वे स्थानक प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जिथे मिळणारे काही खास पदार्थ तिथल्या खासियती ठरल्या आहेत. त्यामुळे प्रवासाच्या निमित्ताने जर कधी या रेल्वे स्थानाकांवर जाणे झालेच तर हे खास पदार्थ चाखण्यास विसरू नका.
food1
गुजरात येथील सुरेन्द्रनगर रेल्वे स्थानकावर मिळणारा, उंटीणीच्या दुधाचा वापर करून बनविला गेलेला चहा अतिशय प्रसिद्ध आहे. गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत केरळ राज्यातील पलक्कड रेल्वे स्थानकावरील ‘पाहम पोरी’, म्हणजेच केळ्यांच्या गरमागरम भज्यांचा आस्वाद घेणे अगदी आवश्यकच. आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा रेल्वे स्थानकाची खासियत म्हणजे येथे मिळणारे गरमागरम, कुरकुरीत चण्याच्या डाळीचे वडे, तर पश्चिम बंगाल राज्यातील खरगपूर रेल्वे स्थानकाची खासियत म्हणजे येथे मिळणारे चमचमीत, मसालेदार ‘दम- आलू.’
food2
खास उत्तर प्रदेशची खासियत असलेली ‘आलू टिक्की’ जर कुठे खावी, तर उत्तर प्रदेशातील टुंडला रेल्वे स्थानकावर, तर स्वादिष्ट, मसलेदार छोले-भटुरे चाखावेत ते पंजाब राज्यातील जालंधर रेल्वे स्थानकावर. मध्य प्रदेश राज्यातील रतलाम रेल्वे स्थानकावर मिळणारा ‘जलेबी-पोहा’ हा पदार्थ येथील खास, तर राजस्थान राज्यातील अबू रोड येथील रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या रबडीची चवच न्यारी. केरळ राज्यातील कालिकत रेल्वे स्थानकावर मिळणारा अस्सल ‘कोहीकोड हलवा’ इतरत्र कुठेही अभावानेच मिळेल. त्यामुळे या ठिकाणांना भेट देणे झालेच तर या पदार्थांचा आस्वाद अवश्य घ्यावा.

Leave a Comment