इराणचे जहाज, अमेरिकेचा हट्ट आणि भारतीयाचा निष्ठा!


इराणच्या एका तेलवाहू जहाजावरून पश्चिम आशियात गेले काही दिवस गोंधळ माजला होता. या जहाजाला रोखण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडले आणि इराण आपल्या भूमिकेवर कायम राहिला. या सर्वात एक गोष्ट महत्त्वाची होती, की या जहाजाचा कप्तान भारतीय होता आणि त्याला आपल्या बाजून वळवण्यासाठी अमेरिकेने भली मोठी लाच देऊ केली होती. या भारतीय कप्तानाने ही ऑफर नाकारून निष्ठेचा एक नवा आदर्श उभा केला आहे.
फायनान्शियल टाईम्स या प्रतिष्ठित अमेरिकी वृत्तपत्राने या संबंधातील वृत्त दिले आहे. इराणच्या ‘आदरियान दरिया-1 ‘ या मालवाहू जहाजाची सूत्रे कॅप्टन अखिलेश कुमार यांच्याकडे होते. या कप्तानाला एका अमेरिकी अधिकाऱ्याने लाखो डॉलरची लाच देऊ केली होती, मात्र अखिलेश यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आता अखिलेश यांच्यावर अमेरिकेने बंदी घातली आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले होते.

आधी ही बातमी अतिशयोक्ती असल्याचे सर्वांना वाटले होते, परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही या बातमीला पुष्टी दिली. तेव्हा सर्वांना खात्री पटली.

“आम्ही जहाजांच्या अनेक कप्तान व जहाज कंपन्यांशी संपर्क केला. त्यांनी परदेशी दहशतवादी संघटनांना मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांना दिला,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स या सेनेला अमेरिका दहशतवादी मानते.

या बातमीनुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील इराणशी संबंधित अधिकारी ब्रायन हूक यांनी अखिलेश यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला होता. हूक यांनी अखिलेश यांना अनेक ईमेल पाठवले. एका ईमेलमध्ये हूक यांनी लिहिले होते, “मी तुम्हाला एक चांगली बातमी देऊ इच्छितो.” यानंतर त्यांनी लाखो अमेरिकी डॉलर रोख स्वरूपात देण्याचा उल्लेख केला. या रकमेतून तुम्ही संपूर्ण आयुष्य आरामात घालवू शकाल, असे त्यांना सांगण्यात आले. अखिलेश यांनी हे तेलवाहू जहाज एखाद्या अशा ठिकाणी न्यावे जिथे त्या जहाजावर ताबा मिळवता येईल, अशी अमेरिकेची इच्छा होती.

दुसरा कोणी असता तर या लाखो डॉलरच्या आमिषाने पाघळला असता. परंतु अखिलेश कुमार यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव साफ नजरेआड केला. याची शिक्षा म्हणून अखिलेश कुमार आणि या जहाजावर निर्बंध घालण्याची घोषणा अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने केली आहे. या निर्बंधांनुसार, अखिलेश कुमार यांची एखादी संपत्ती अमेरिकेत असेल तर ती जप्त केली जाईल. तसेच अखिलेश कुमार यांच्याशी केला जाणारा कोणताही अमेरिकी व्यवहार गुन्हा मानला जाईल.

‘आदरियान दरिया-1’ हे जहाज जुलै महिन्यात जिब्राल्टर जवळ ब्रिटनच्या सागरी हद्दीत पकडण्यात आले होते. या जहाजातून इराणमधील तेल सीरियाला नेण्यात येत असल्याचा आरोप होता. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्यावर युरोपीय महासंघाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे हे जहाज जप्त करण्यात आले. अखेर सहा आठवड्यांनंतर 18 ऑगस्ट रोजी जिब्राल्टरे हे जहाज सोडले. त्यासाठी हे जहाज युरोपीय महासंघाने बंदी घातलेल्या देशांमध्ये जाणार नाही, असे लेखी आश्वासन जिब्राल्टरने अमेरिकेला दिले होते.

या संदर्भात इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेवर एका तज्ञाने लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, “या चरित्रवान भारतीय कप्तानाला आम्ही सलाम करतो. त्यांनी सिद्ध केले, की अमेरिका किंवा तिच्या डॉलरपेक्षा ते जास्त सामर्थ्यवान आहेत. मोठमोठ्या शक्तींनी अत्याचार केलेल्या सीरियाकडे ते जहाज घेऊन गेले. कप्तान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना तीन आठवडे ताब्यात ठेवण्यात आले मात्र त्यांचे मनोधैर्य खचले नाही.”

हा लेखक पुढे म्हणतो, “आजच्या जगातही अशी माणसे आहेत ज्यांना पैशाने विकत घेता येत नाही आणि जे आपल्या नैतिक सिद्धांतांशी तडजोड करत नाहीत. मग तुम्ही त्यांच्यावर कितीही दबाव टाका. आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल, की ते इराणीही नाहीत आणि मुस्लिमही नाहीत. ते मूल्य आणि सिद्धांतांवर श्रद्धा असलेले मनुष्य आहेत.”

आपल्या अढळ निष्ठेने भारतीयांची मान उंचावणाऱ्या अखिलेश कुमार यांना खरोखरच सलाम!

Leave a Comment