चीनमध्ये जन्माला आली पहिली क्लोन मांजरी


सिंगोजीन कंपनीने चीनमध्ये पहिली क्लोन मांजरी जन्माला घातली आहे. गार्लिक नावाच्या एका पाळीव मांजरीची ही क्लोन २१ जुलै रोजी जन्मली असून गार्लिक मांजरीचा सात महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. मांजरीचा क्लोन तयार करणारी सिंगोजीन ही चीनमधली पहिली कंपनी आहे मात्र त्यांनी आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त पाळीव कुत्र्यांचे क्लोन तयार केले आहेत.

क्लोन तयार करण्याची प्रक्रिया खूपच महागडी आहे. कुत्र्याच्या एका क्लोनसाठी ५३ हजार डॉलर्स म्हणजे ३८ लाख रुपये खर्च येतो तर मांजरीच्या क्लोनसाठी ३५ हजार डॉलर्स म्हणजे २५ लाख रुपये खर्च आला आहे. कंपनीचे सीइओ मी जीडोंग म्हणाले, क्लोन बनविण्यासाठी खर्च मोठा असला तरी पाळीव प्राण्यांचे क्लोन बनविण्यासाठी मोठी मागणी आहे. त्यात युवा अधिक संख्येने आहेत. बहुतेक ठिकाणी पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य समजले जाते. चीन मधील युवा पिढीच्या भावनिक गरजा हे पाळीव प्राणी पूर्ण करतात.

गार्लिक मांजरीचा क्लोन बनवून घेणारा युवक म्हणाला गार्लिकच्या या दुसऱ्या अवतारावर मी खुश आहे. ही अगदी गार्लिक सारखीच दिसते आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीन मध्ये पाळीव प्राणी बाजार वाढत चालला असून पेट फेअर एशियाच्या रिपोर्टनुसार चीन मध्ये पाळीव प्राण्यांवरील खर्च २३.७ अब्ज डॉलर्स म्हणजे १ लाख ७० हजार कोटींवर गेला आहे. जगाच्या बहुतेक देशात प्राणी क्लोन करण्यास बंदी आहे. मात्र द. कोरिया आणि अमेरिकेत पूर्व परवानगीने प्राण्यांचे क्लोन बनविण्यास मज्जाव नाही.