यामुळे इंडिगोचे विमान अडकले सात तास धावपट्टीवर


मुंबई – मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीलाही फटका बसला. तब्बल सात तास उड्डाणाच्या तयारीत धावपट्टीवर मुंबईहून नवी दिल्लीला निघालेले इंडिगो कंपनीचे विमान अडकून पडले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या रागाला वाट मोकळी करून दिली. आपल्याला कर्मचाऱ्यांकडून विमान धावपट्टीवर थांबले असताना आवश्यक मदत दिली गेली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

मुंबईहून बुधवारी दुपारी ३.१५ मिनिटांनी निघून दिल्लीला ५.३० वाजता इंडिगोचे ६ई-६०९७ हे विमान पोहोचणे अपेक्षित होते. पण हे विमान पावसामुळे मुंबईहून बुधवारी रात्री ९.५५ वाजता उडाले. याबाबत एका प्रवाशाने केलेल्या ट्विटनुसार, इंडिगोच्या ६ई-६०९७ या विमानाला गेल्या सहा तासांपासून काय झाले आहे याची माहिती नाही. दर अर्धा तासांनी विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलली जाते आहे. विमानात आम्ही बसलो आहोत. पण वैमानिकाकडून उड्डाणासाठी वेळ असल्याचे सांगितले जाते आहे.

दुसऱ्या एका प्रवाशाने केलेल्या ट्विटनुसार इंडिगोचे ६ई-६०९७ विमानाला काय झाले आहे? विमानात प्रवाशांना बंद करून ठेवले आहे. अशा स्वरुपाच्या विमान कंपनीचा परवानाच रद्द केला पाहिजे. या संदर्भात इंडिगोने जारी केलेल्या निवेदनानुसार, मुंबईतील मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे तसेच वाहतूक कोंडी झाल्यामुळे आमच्या कंपनीचे कर्मचारी वेळेत विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. या काळात मुंबईमध्ये ३० विमाने उड्डाण करू न शकल्याने जमिनीवरच होती. आम्ही अडकलेल्या प्रवाशांसाठी सर्व प्रकारची मदत करीत आहोत.

Leave a Comment