प्रभासला जाणवत आहेत यशाचे साईड इफेक्ट्स!


प्रभासला जाणवत आहेत यशाचे साईड इफेक्ट्स! बाहुबलीच्या पाठोपाठ ‘साहो’च्या रूपाने अभिनेता प्रभासच्या खात्यात आणखी एका मोठ्या यशाची नोंद झाली आहे. मात्र त्याच सोबत त्याला या यशाचे अनुषंगिक परिणामही (साईड इफेक्ट्स) जाणवत असून त्याला आपल्या सहकाऱ्यांच्या ईर्ष्येचा सामना करावा लागत आहे.

‘साहो’च्या हिंदी आवृत्तीने भारतात 100 कोटी रुपयांचा निव्वळ धंदा केला आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या कमाई तज्ञांनी प्रभासला अखिल भारतीय तारा म्हणून स्वीकारले आहे. प्रभास हा आता उत्तर भारतीय बाजारपेठेत हृतिक रोशन आणि अन्य बॉलिवूड स्टार्सपेक्षा मोठा स्टार आहे, असे वक्तव्य तरन आदर्श या बॉलिवूडच्या व्यापार तज्ञाने नुकतेच केले आहे. याचा अर्थ असा, की आता जेव्हा त्याचे पुढील चित्रपट पडद्यावर येतील तेव्हा बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सच्या बरोबरीने त्याला वागणूक दिली जाईल. बाहुबली हा एक पोशाखी चित्रपट होता, तर साहो हा निव्वळ मारधाडपट आहे. मात्र प्रभासचे पुढचे चित्रपट कुठल्याही प्रकारातील असो किंवा दिग्दर्शक कोणीही असो, बॉलिवूडमध्ये त्याच्या चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात स्वागत होईल. एखाद्या दाक्षिणात्य ताऱ्याच्या दृष्टीने ही एक मोठी कामगिरी आहे.

मात्र त्याच्या याच यशामुळे त्याच्या बरोबरीच्या तारे-तारकांना त्याची ईर्षा वाटू लागली आहे. मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या प्रमाणे बॉलिवूड म्हटले जाते, त्या प्रमाणे तेलुगु चित्रपट सृष्टीला टॉलीवूड असे म्हटले जाते. या टॉलिवूडमधील अनेक जणांना प्रभासच्या यशाचा हेवा वाटतो. पंजाबपासून केरळपर्यंतच्या प्रभासचा चाहतावर्ग आणि लोकप्रियता पाहून टॉलीवूडमधील मोठमोठ्या ताऱ्यांना असुरक्षितता जाणवू लागली आहे.

महेश बाबू, राम चरण, एनटीआर ज्युनियर हे प्रभासचे समकालीन व समवयस्क तारे टॉलीवडूचे अग्रणी तारे-तारका मानले जातात. त्याच्या आधीच्या पिढीतील चिरंजीवी, नागार्जुन आणि वेंकटेश हेही अद्याप सक्रिय आहेत. मात्र प्रभासने तेलुगू भाषक राज्यांच्या बाहेर (तेलंगाणा व आंध्र प्रदेश) ज्या प्रकारे मोठ्या पडद्यावर स्वतःला सुस्थापित केले आहे, तसे यश ते मिळवू शकलेले नाहीत. या सर्व ताऱ्यांना प्रभासच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मानधन मिळते, मात्र प्रभासने आपला जो प्रभाव जो निर्माण केला आहे ते यांपैकी कोणीही करू शकलेले नाही.

चित्रपट समीक्षकांनी साहोच्या प्रदर्शनानंतर त्याच्यावर सडकून टीका केली. मात्र त्यावेळी टॉलिवूडमधील एकाही मोठ्या कलावंताने साहोच्या बाजूने मत प्रदर्शन केले नाही. म्हणूनच प्रभासच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर महेशबाबू, एनटीआर व अन्य कलावंतांच्या चाहत्यांनी जाणूनबुजून साहोला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

सुपरस्टार महेशबाबू आणि प्रभास हे तेलुगु चित्रसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहेत. प्रभासप्रमाणेच महेशबाबू दक्षिणेतच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. प्रभासची थेट स्पर्धा महेशबाबूशी असल्याचे मानले जाते. परंतु आता प्रभासने महेशबाबूला खूप मागे टाकले आहे. रिबेल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासच्या मागील तिन्ही चित्रपटांनी 300 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये जागा मिळवली आहे. यातील दोन चित्रपट बाहुबलीचे दोन भाग आणि तिसरा साहू हा चित्रपट होय. परंतु महेशबाबूचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई करू शकलेला नाही.
लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाँ यांच्या संग्रहालयात प्रभासचा बाहुबलीच्या अवतारातील मेणाचा पुतळा बसवण्यात आला आहे. हा मान मिळवणारा तो दक्षिण भारतातील पहिला कलाकार आहे. रजनीकांत आणि कमल हासन यांनाही हा मान मिळालेला नाही. गंमत म्हणजे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात महेशबाबूचाही मेणाचा पुतळा मदाम तुसाँ संग्रहालयात आला.

दाक्षिणात्य चित्रसृष्टीतून येऊन हिंदीत यश मिळवणारा एकच कलाकार आतापर्यंत होता आणि तो म्हणजे रजनीकांत. त्यांनी 1980 व 1990च्या दशकात तमिळनाडूच्या बाजारपेठेपलीकडे आपला प्रेक्षकवर्ग तयार केला, लोकप्रियता वाढविली आणि नंतर उत्तर भारतातील आपले स्थानही बळकट केले. परंतु हे करण्यासाठी रजनीकांत यांना बरीच वर्षे लागली. त्या तुलनेत प्रभासने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. जागतिक पातळीवरही त्याला स्थान मिळाले आहे. विविध फिल्मी वाहिन्यांवरही प्रभासच्या चित्रपटांना चांगलीच मागणी असते.

आपल्या 15 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने अनेक मान-सन्मान मिळवले. मात्र चित्रपटसृष्टीत यश हेच केवळ महत्त्वाचे मानले जाते. याबाबतीत प्रभासने सगळ्यांनाच अचंबित केले आहे. आज तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. त्यामुळे प्रस्थापितांना त्याच्याबद्दल हेवा वाटणे स्वाभाविकच आहे. यशासोबत हेच चालायचेच!

Leave a Comment