खड्डे चुकवण्यासाठी फेरारी चालकाची तारेवरची कसरत


काल मुंबईत झालेल्या धुंवादार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने झालेल्या वाहतूककोंडीमुळे अनेक वाहने रस्त्यांवर अडकून पडली. सोशल मीडियावर काल दिवसभर पावसाच्या पाण्यात अडकलेल्या अनेक वाहनांचे व्हिडिओ व्हायरल होत होते. पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमधून जाणाऱ्या फेरारी कारचा या व्हिडिओंमध्ये समावेश होता.

एक लाल रंगाची फेरारी पोर्टोफीनो गाडी ट्विटरवर एका युझरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये खड्डे पडलेल्या रस्त्यांवरुन जाताना दिसत आहे. मुंबईमधील हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांमधून जाताना खूपच कसरत करावी लागत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. चालक रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी गाडी अगदी रस्त्याच्या कडेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. गाडी तरी देखील खड्ड्यांमध्ये अडकत असल्याचे व्हिडिओत पहायला मिळते.


परदेशी कंपनीच्या इतर गाड्यांप्रमाणे फेरारीचाही ग्राऊण्ड क्लियरन्स म्हणजेच गाडीचा खालील भाग आणि जमीनीमधील अंतर खूपच कमी असल्यामुळे खड्डे असणाऱ्या ओबडधोबड रस्त्यांवर अशा महागड्या गाड्या सहज चालवता येत नाहीत. कधीच सरकारपेक्षा जास्त श्रीमंत होऊ नका, असा टोला हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युझरने कॅप्शनमध्ये लगावला आहे.


५० हजारहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेकांनी याच व्हिडिओवर रिप्लाय करुन ऐरोलीमधील पुलाखाली पाण्यात अडकलेल्या जग्वार गाडीचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये जग्वार गाडी गुडघाभर पाण्यात अडकल्याचे दिसत आहे तर याच गाडीच्या बाजूने महिंद्रा बोलेरो गाडी सहज निघून जाताना दिसते.

Leave a Comment