गडकरी बोलले, उंदीर हलले


सध्याचा मोसम कोणता आहे, असे कोणी विचारले तर सध्याचा हंगाम हा पक्षांतराचा आहे असे बेलाशक सांगता येईल. वेगवेगळ्या पक्षांतून नेते आणि कार्यकर्ते अशा तऱ्हेने एकमेकांच्या पक्षात उड्या मारत आहेत, की पावसाळ्यात उड्या मारणाऱ्या बेडकांनाही लाज वाटावी. गुळाला बघितल्यावर मुंगळे आपोआप त्याच्या दिशेने ओढले जावेत इतक्या सहजतेने नेते दुसऱ्या पक्षाकडे ओढले जात आहेत. त्यातही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे तर जास्तच. ज्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळात नाही अशांना भाजपच्या सहकारी पक्षांकडे ढकलण्यात येत आहे. त्यांचा एकमेव एकमेव उद्देश यशाच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या तुंबड्या भरणे हा आहे.

ही लाट किती जबरदस्त आहे याचा अंदाज एका आकडेवारीवरून यायला हरकत नाही. केवळ तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील तीन राज्यांत कमीत कमी 39 मोठ्या नेत्यांनी आतापर्यंत पक्षाच्या टोप्या बदलल्या आहेत. हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र ही ती तीन राज्ये असून या तिन्ही राज्यांत पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. हा काही योगायोग असू शकत नाही. यातील बहुतांश नेते भाजपमध्ये गेले आहेत. यातील सर्वात मोठा धमाका हरियाणा राज्यात झाला. तिथे भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या एकानंतर एक 10 आमदारांसहित 12 नेत्यांनी भाजपशी घरोबा केला आहे. ही मालिका अजूनही सुरू आहे.

खरे तर सर्वच नेते सत्तेच्या मोहाने आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील होतात. जेव्हा तिथेही त्यांचा स्वार्थ साधला जात नाही तेव्हा ते परत आपल्या मूळ पक्षात परतण्याचा विचार करतात. काही जण स्वतःचाच एक पक्ष काढतात किंवा आणखी तिसऱ्या एखाद्या पक्षात जातात. उदाहरणार्थ, कोलकाता शहराचे माजी आमदार आणि चार वेळेस आमदार राहिलेले सोवन चटर्जी. हे चटर्जी महाशय गेल्या 14 ऑगस्ट रोजीच आपली जवळची सहकारी बैशाखी बॅनर्जी हिच्या सोबत भाजपमध्ये सामील झाले. मात्र सातत्याने अपमान होत असल्याचे कारण देत त्यांनी भाजप सोडून पुन्हा तृणमूलमध्ये परतण्याचा विचार सुरू केला आहे.

मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतरबाज नेत्यांना बेडूक किंवा मुंगीची नव्हे तर उंदराची उपमा दिली आहे. नागपूर येथे रविवारी एका सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे परखड मतप्रदर्शन केले. “आजकाल लोक सत्ताधाऱ्यांच्या मागे धावतात. आज आम्ही सत्तेत आहोत म्हणून ते आमच्या मागे येताहेत. उद्या दुसरं कोणी सत्तेत येईल तेव्हा त्यांच्यामागून धावतील. अशा लोकांकडून कधी इतिहास लिहिला जाणार नाही. पक्ष संकटात असला तरी त्या काळात पक्षाच्या विचारसरणीला चिकटून राहणारे लोकच इतिहास लिहू शकतात,” असे ते म्हणाले.

पक्षाच्या विचारसरणीला चिकटून राहा . बुडणाऱ्या जहाजातून उंदीर उड्या मारतो तशा उड्या मारून पक्षाला रामराम ठोकू नका, असा डोस त्यांनी पक्ष बदलणार्‍या राजकीय मंडळींना पाजला. परंतु सत्तेच्या मोहाने आंधळे झालेले उंदीर त्यांच्या या म्हणण्याकडे लक्ष देतील याची सुतराम शक्यता नाही.
गडकरी यांच्या मताशी मिळते-जुळते विचारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 30 जुलै रोजी रांचीत बोलताना व्यक्त केले होते. “काही अपेक्षा घेऊन येणाऱ्यांसाठी संघात जागा नाही. सेवा आणि समर्पणाचा भाव घेऊन येणारेच येथे टिकू शकतात. त्यामुळे अपेक्षा घेऊन येणाऱ्यांपासून आपण सावधान राहण्याची गरज आहे.” तसेच त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांना हाही सल्ला दिला होता, की संघात कोणतीही जबाबदारी देताना त्या व्यक्तीचे आचार-विचार, व्यवहार आणि पार्श्वभूमी पूर्णपणे तपासून घ्यायला हवी.

खरे म्हणजे त्या वक्तव्याद्वारे भागवत यांनी भाजपकडेच निर्देश केला होता. भाजप ही संघाचीच एक आघाडी आहे आणि भाजप नेते वरील निकषांकडे दुर्लक्ष करून तसेच आयारामांची विचारसरणी आणि धोरणांकडे लक्ष न देता त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहेत. या दृष्टीने पाहिले तर गडकरी आणि भागवत या दोघांनीही सत्तेसाठी टोप्या फिरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचाच इशारा दिला आहे. जी व्यक्ती आपल्या पक्षाची झाली नाही ती अन्य पक्षाशी निष्ठा काय बाळगणार आणि त्याच्याशी मिसळून तरी कसा जाणार?

म्हणूनच राजकारणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीसाठी आपल्या मूळ पक्षाशी कटिबद्ध राहून काम करणेच चांगले आहे. कारण इतर पक्षात जाणयामुळे त्याची वैचारिक निष्ठा आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते आणि त्याची स्थिती दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी होते.

Leave a Comment