यंदाच्या सुट्ट्यांमध्ये राजस्थानला जात आहात? मग या किल्ल्यांना अवश्य भेट द्या

fort
राजस्थान या ठिकाणी पर्यटनासाठी भरपूर प्रेक्षणीय ठिकाणे असून, हिवाळ्याचा ऋतू या ठिकाणी पर्यटनासाठी सर्वोत्तम ठरत असतो. त्यामुळे बहुतेक देशी-विदेशी पर्यटक नाताळच्या सुट्ट्यांमध्ये राजस्थानला भेट देणे पसंत करतात. राजस्थानला मुख्यत्वे अनेक ठिकाणी बनविले गेलेले ऐतिहासिक, प्राचीन किल्ले हे मुख्य आकर्षण आहेत. त्यामध्ये देखील जयपूरचा आमेर फोर्ट, जोधपुरचा मेहरानगड फोर्ट आणि जैसलमेरचा किल्ला ही लोकप्रिय पर्यटनस्थळे आहेत. पण या शिवाय देखील राजस्थान येथे अनेक सुंदर किल्ले आहेत, जिथे आवर्जून भेट द्यावी.
fort1
जयपूरच्या जवळ, अरावली पर्वतरांगांच्या कुशीमध्ये विसावलेल्या नहारगड फोर्टवरून संपूर्ण जयपूर शहराचे अतिशय मनोरम दर्शन घडते. हा भव्य किल्ला १७३४ साली महाराजा सवाई जयसिंह (दुसरे) यांनी बांधविला होता. या ठिकाणी पर्यटकांनी आवर्जून पाहावी अशी माधवेंद्र भवन नामक आलिशान महालांची दोन मजली इमारत आहे. तसेच या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे, बगीचे आहेत. येथील मंदिरे, महाल यांच्या निर्मितीवर राजपूत, मुघल आणि काही अंशी युरोपियन स्थापत्यशास्त्राची छाप पहावयास मिळते.
fort2
मेवाडची शान असलेला कुंभलगड फोर्ट अरावली पर्वतराजीमधील एका पर्वतावर उभा आहे. उदयपुर जवळील राजसमंद जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. पंधराव्या शतकामध्ये राणा कुम्भाने या किल्ल्याचे निर्माण करविले होते. त्यानंतरही चारशे वर्षे, म्हणजेच एकोणिसाव्या शतकापर्यंत या किल्ल्यामध्ये शाही परिवाराचे वास्तव्य होते. आता मात्र हा किल्ला पर्यटनासाठी खुला करण्यात आला असून, येथे दररोज सायंकाळी पहावयास मिळणारी रोषणाई हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे. उदयपुर पासून हा किल्ला ८२ किलोमीटर अंतरावर असून, येथे पोहोचण्यासाठी खासगी वाहनसेवा उपलब्ध आहे.
fort3
बिकानेर येथे असणारा जुनागड फोर्ट, बिकानेर शहरामध्ये, ऐन वस्तीच्या ठिकाणी उभा आहे. या किल्ल्याला खरेतर ‘ चिंतामणी ‘ या नावाने ओळखले जात असे, पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला येथील शाही परिवार ‘लालगड पॅलेस’मध्ये स्थानांतरीत झाल्यानंतर या किल्ल्याला जुनागड फोर्ट या नावाने ओळखले जाऊ लागले. बिकानेर येथील जुनागड फोर्ट राजस्थानमधील अनेक सुंदर, भव्य किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यामध्ये आता वस्तूसंग्रहालय असून, अनेक प्राचीन अस्त्रे-शस्त्रे, तत्कालीन गृहोपयोगी वस्तू, राजे महाराजे परिधान करीत असलेले पोशाख इत्यादी वस्तू येथे पहावयास मिळतात.

Leave a Comment