बिस्किट नव्हे, स्मार्टफोन खपतायेत!


पारले बिस्किटांचे नाव ऐकला नाही, असा भारतीय नागरिक क्वचितच सापडेल. गेली अर्धे-अधिक शतक या बिस्किटांनी भारतीयांच्या मनावर मोहिनी घातली आहे. भारतासहित कॅमेरून, नायजेरिया, घाना, इथियोपिया, केनिया, आयव्हरी कोस्ट आणि नेपाळ अशा सात देशांमध्ये या बिस्किटांनी आपली बाजारपेठ निर्माण केली आहे. तसेच 2003 मध्ये पारले ही जगात सर्वाधिक बिस्किट विक्री करणारी कंपनी बनली होती. गेल्या वर्षी तर पारलेने मेक्सिकोतही एक प्रकल्प सुरू केला.

अशा या पारलेने गेल्या आठवड्यात मथळ्यांमध्ये मोठी जागा मिळवली होती. पारलेच्या पाच रुपयांच्या बिस्किटांच्या पुड्यांची विक्री कमी झाली आणि त्यामुळे खर्च कपात करण्याची वेळ कंपनीवर आली होती. त्यासाठी 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची शक्यता पारलेने वर्तवली होती. तिच्या पाठोपाठ ब्रिटानिया ही आणखी एक प्रसिद्ध कंपनी आपल्या बिस्किटांचे भाव वाढवणार असल्याचे समोर आले होत. ब्रिटानियानेही खर्च कपातीचे धोरण जाहीर केले होते. देशात आर्थिक मंदी असून या मंदीचा पहिला फटका स्वयचंलित वाहन उद्योगाला बसला. त्यानंतर बिस्किट कंपन्यांना ही झळ जाणवली, असे त्यावेळी मानले गेले. पारलेच्या 5 रुपयांच्या बिस्किट पुड्यात आणि मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये तसे काहीहीच साम्य नाही. मात्र या दोघांनाही मागणीतील घसरणीमुळे मोठा फटका बसला, या गोष्टी त्यांच्यासाठी समान ठरल्या.

मात्र या सर्व समजांना धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे देशात पाच रुपयांचा बिस्किट पुडा विकला जात नाहीये, मात्र 15,000 रुपयांचा स्मार्टफोन विकला जात आहे. बिस्किटांच्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहेत, तर स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहेत. देशात मंदी आहे, असे म्हणणाऱ्या आर्थिक तज्ञांना या स्मार्टफोनच्या वाढीचा खुलासा करताना नाकी नऊ येत आहेत. मंदीच्या फटक्यातून मोजकेच उद्योग सुटले आणि त्यातील महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे स्मार्टफोन.

बिस्कीट आणि साबण यांसारख्या वस्तू फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) या श्रेणीत येतात. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत चढउतार नेहमीच पाहायला मिळतो. परंतु मजबूत किंमत असलेल्या स्मार्टफोनच्या विक्रीत सतत वाढ होत आहे. भारताच्या स्मार्टफोन विक्रीविषयीच्या नवीन आकडेवारीनुसार, स्मार्टफोनची विक्री 17 टक्क्यांनी वाढली आहे तर साबण आणि बिस्किटांच्या विक्रीत एक टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत शिपमेंटमध्ये जवळपास 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या तिमाहीत आणखी चांगली विक्री होण्याची अपेक्षा आघाडीच्या फोन उत्पादकांना आहे. कारण उत्सवाच्या हंगामात ग्राहक आपला हात मोकळा सोडतात.

आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) या संस्थेच्या ‘आशिया-पॅसिफिक क्वार्टरली मोबाइल फोन ट्रॅकर’ अहवालानुसार, भारतीय स्मार्टफोन बाजारात दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) 36.9 दशलक्ष मोबाईलची निर्यात झाली आहे. म्हणजेच यात वार्षिक 9.9 टक्क्यांची वाढ झाली तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत 14.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

“आम्हाला बाजारपेठेत अजिबात मंदी दिसत नाही. खरं तर, उत्सवाच्या हंगामात एक अतिशय सकारात्मक वातावरणे निर्माण होते. स्मार्टफोन ही जीवनाश्यक गरज बनली आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या मोबाईल व्यवसायाचे मुख्य विपणन अधिकारी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सिंग यांनी लाईव्ह मिंट वृत्तपत्राला सांगितले.

विशेष म्हणजे बिस्किटांच्या क्षेत्रात कमी किंमतीच्या पुड्यांची विक्री कमी झाली मात्र महागड्या बिस्किटांची विक्री स्थिर आहे. त्याच प्रमाणे मोबाईलच्या क्षेत्रात साध्या फोनची विक्री कमी झाली आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत फीचर फोनच्या शिपमेंट 26.3 टक्क्यांनी कमी झाली.

या सर्वाचा अर्थ असा, की भारताच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करणे ही अत्यंत अवघड बाब आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाचा परिणाम येथील स्थानिक खरेदीवर कधीही पडतनाही. बिस्कीट विकत घेणाऱ्यांना बाजारपेठेची फारशी काळजी करण्याची गरज नसते, मात्र मोबाईल विकत घेणाऱ्यांना आपल्या बजेटची पूर्ण काळजी घ्यावी लागते. बिस्किट खाणारे बहुतांश जण छोटी मुले असतात. या मुलांकडे खरेदीची शक्ती नसते, ती असते त्यांच्या पालकांकडे. मात्र मोबाईल घेणाऱ्याकडे 15 हजारांचा मोबाईल घेण्याची ताकद असेल तरच तो ते विकत घेतो. जर लोक पाच रुपयांच्या बिस्किट पुड्याऐवजी स्मार्टफोन जास्त विकत घेत असतील, तर मंदीवर प्रश्नचिन्ह उभे राहणारच.

Leave a Comment