जंक फूड आणि सुपर मार्केट – एक धोकादायक साथीदारी


पिझ्जा, बर्गर, फ्रेंच फ्राय, पेस्ट्री, समोसा, कचोरी, कार्बोनेटेड पेय अशा खाद्यपदार्थांनी आज अत्यंत लोकप्रियता मिळवली आहे. आजच्या पिढीची ही पहिली पसंद बनली आहे. अनेक प्रौढांनाही अशा पदार्थांनी भुरळ घातली आहे कारण त्यामुळे स्वयंपाक करण्याचे त्यांचे कष्ट वाचतात. अर्थात सातत्याने जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात.

टीव्हीवरील जाहिराती पाहून मुले व युवकांना जंक फूड खाण्याची सवय लागते, असे आतापर्यंतच्या संशोधनावरून मानण्यात येत असे. टीव्ही जास्त पाहणारे युवक 500 पेक्षा जास्त चिप्स, बिस्किट आणि शीतपेयांचे सेवन करतात. पोषणतज्ञ पॉल जॉन्सन यांच्या म्हणण्यानुसार, जंक फूड सतत खाल्ल्यामुळे मेंदूची कार्यपद्धती बदलते आणि ती ग्राहकांना जास्त आसक्त करते. कँडी, आईस्क्रीम, बेकरीतील पदार्थ, खारे पदार्थ किंवा शीतपेये यांच्या जाहिराती आपल्याला टीव्हीवर कोणत्याही वेळेस पाहायला मिळतात. खिचडी किंवा भाकरी किंवा पोह्यांची जाहिरात आपण कधी पाहिली आहे का?

आता प्रश्न असा येतो, की जंक फूड म्हणजे काय? जंक फूड म्हणजे जे खाद्यपदार्थ कारखान्यात आधीच तयार करून प्लॅस्टिक, पुठ्ठा किंवा कागदात पॅक करून विकण्यात येतात. ज्यामध्ये चरबी, साखर आणि मिठाचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ. अशा पदार्थांमध्ये तंतूमय पदार्थ कमी असतात, व्हिटामिन आणि खनिजेही कमी असतात. आणि या पदार्थांच्या विक्रीसाठी सुपर मार्केट मोठी भूमिका निभावत आहेत. तुम्ही सुपर मार्केटमध्ये जाताच या गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर फिरू लागतात. शिवाय या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूटही (डिस्काऊंट) दिली जाते. ही सूट वेगवेगळ्या स्वरूपात समोर येते. हाफ प्राईस चिप्स, बाय वन गेट वन फ्री सॉफ्ट ड्रींक, टू-फोर-वन चॉकलेट अशा प्रकारची आमिषे दाखवली जातात.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या एका चमूने पूर्ण एक वर्ष याबाबत संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर केले आहेत. सुपर मार्केटमध्ये डिस्काऊंटवर विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जंक फूडचे प्रमाण आरोग्यदायी पदार्थांच्या तुलनेत जास्त असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात खाद्यपदार्थांना स्टार रेटिंग दिली जाते त्यामुळे एखादा पदार्थ किती पौष्टिक आहे किंवा घातक आहे, हे लोकांना कळते. इतकेच नाही तर पौष्टिक पदार्थांच्या तुलनेत जंक फूडवर दुप्पट सूट दिली जात असल्याचेही या संशोधनात आढळले.

मेलबर्नमधील डॅकिन युनिव्हर्सिटीचे संशोधक व सहयोगी प्राध्यापक आणि ग्लोबल ओबेसिटी सेंटरचे सहयोगी संचालक अ‍ॅड्रियन कॅमेरून, पीएचडी संशोधक क्रिस्टीना झोरबास, डेव्होरह रीसेनबर्ग आणि कॅलरीन बॅकहोलर यांनी हे संशोधन करून विविध माध्यमांतून त्याचे निष्कर्ष मांडले आहेत.
हे पदार्थ सुपर मार्केटमध्ये अशा रीतीने मांडलेले असतात, की दाखल होताच ते नजरेस पडतील. तसेच बिल करतानाही तुमच्या नजरेस पडतील, अशा रीतीने ते मांडलेले असतात. सुपर मार्केटमधील पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिमवरही याच पदार्थांच्या जाहिराती सुरू असतात. अनेकदा या जंक फूड कंपन्यांची संबंधित सुपर मार्केट कंपनीशी करारही झालेले असतात. या पदार्थांचे उत्पादक आपली उत्पादने सुपर मार्केट कॅटलॉगमध्ये किंवा दर्शनी भागात किंवा बिलाच्या टेबलजवळ दिसण्यासाठी मोठ्या रकमा मोजतात.

या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार आपल्या डोळ्यांसमोर जंक फूड आणून सुपर मार्केट आपल्याला गोंधळात टाकतात. उदाहरणार्थ, चॉकलेट हे नेहमी खालच्या कप्प्यांमध्ये ठेवलेले असतात जेणेकरून ते लहान मुलांच्या नजरेस पडतील. त्यामुळे बालकांना त्यांची लालूच निर्माण होते. मोठ्या सुपर मार्केट साखळी दुकानांमध्ये 30,000 पेक्षाही जास्त उत्पादनांचा साठा असतो.

हे संशोधन ऑस्ट्रेलियात झाले असले तरी आपल्याकडेही ते लागू आहे. त्यामुळे आपल्यालाही त्यापासून धडा घेण्याची गरज आहे. कारण वाढता लठ्ठपणा आणि अन्य समस्या आपल्याकडेही वाढल्या आहेत आणि त्याला जंक फूड कारणीभूत ठरत असल्याचेही सिद्ध झाले आहे. जगभरातील सरकारांनीही अशा घातक खाद्यपदार्थांवर सूट देण्यातील धोका ओळखण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये अशा घातक पदार्थांवर सूट देण्यास मनाई करण्याचा विचार करत आहे. आपणही त्याचा विचार करायला हरकत नाही.

Leave a Comment