भाजपमध्ये ममताही चालतील…!


“भारतीय जनता पक्षात मेगाभरती चालू असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही निवडक नेत्यांना पक्षात प्रवेश देत आहोत. पक्षातील 98 टक्के नेते मूळचेच आहेत आणि नव्या नेत्यांमुळे प्रश्न निर्माण होत नाही,” असे स्पष्टीकरण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागले. यातून भाजपमधील महाभरतीची चर्चा किती पसरली आहे याचा अंदाज यायला हरकत नाही.

फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेत आहेत आणि याच दरम्यान लातूर येथे रविवारी त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपामध्ये नेत्यांनी प्रवेश करण्याला महाभरती असे नाव माध्यमांनी दिले असले तरी ही महाभरती नाही. ज्यांना विधानसभेत पक्षाची उमेदवारी दिली जाईल अशा चार नेत्यांना आतापर्यंत पक्षात घेतले असून अजून असे चार-पाच नेते पक्षात सामील केले जाईल. भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती होण्याची शक्यता आहे आणि या युतीच्या जागांचा विचार करूनच अशा नेत्यांचा समावेश केला जाईल.

“अनेकदा पक्षाची शक्ती वाढते त्यावेळी आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि विचार करतो की, आता कशासाठी विस्तार करायचा. पण मला वाटते की सातत्याने शक्तीसंचय केला पाहिजे. नेत्यांच्या बाबतीत निवडक व्यक्तींचा समावेश करत असलो तरी कार्यकर्त्यांच्या बाबतीत मोकळेपणाने प्रवेश दिला जातो,” असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकीकडे असे पक्षातील भरतीला तात्विक स्वरूप देत असताना देशाच्या दुसऱ्या टोकाला काहीसे तसेच चित्र दिसत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक आहेत. मोदी यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तर भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करायला त्या तयार झाल्या होत्या आणि भावी पंतप्रधानपदाचे मनसुबे त्या रचत होत्या. अशा या ममतांना पक्षात घ्यायलाही भाजप नेते तयार आहेत.

“आमच्या पक्षाच्या नियम व विचारसरणी अनुसरणार असतील तर ममता बॅनर्जींनाही पक्षात घेण्यास आम्ही तयार आहोत. त्या सामील झाल्यास त्यांचेही भाजपाचे स्वागत आहे,” असे मुकुल रॉय यांनी म्हटले आहे. मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे नेते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपशी घरोबा केलेला. हे रॉय महाशय पश्चिम बंगाल विधानसभेच्या सभागृहात आपल्या पक्षाच्या आमदारांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी कोणी तरी त्यांना प्रश्न विचारला की “ममता बॅनर्जींविरूद्ध तुमच्या बर्‍याच तक्रारी आहेत पण तरीही त्यांना तुम्ही आपल्या पक्षात सामावून घ्याल का?”

त्यावर रॉय म्हणाले, “ममता बॅनर्जी यांना जर पक्षात सामील होण्याची इच्छा असेल तर पक्षाची विचारसरणी आणि व नियमांचे पालन केले तरच आम्ही त्यांना स्वीकारू.”

समजा बॅनर्जी भाजपमध्ये सामील झाल्या तर त्या पुन्हा मुख्यमंत्री होतील का, असेही त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर याबाबत नंतर निर्णय होईल असे ते म्हणाले.

रॉय यांना हा प्रश्न विचारला जाण्याचीही एक गंमत आहे. जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक छायाचित्र प्रसृत झाले होते. हे छायाचित्र भाजपच्या सदस्यत्व कार्डाचे होते आणि त्यावर ममता बॅनर्जी यांचे चित्र होते. ममतांनी भाजपचे सदस्यत्व घेतले आहे आणि त्यांचा सदस्यत्व क्रमांक 4209 आहे, असे त्यावर लिहिले होते. हे बनावट छायाचित्र भाजपनेच पसरवल्याची टीका तृणमूल काँग्रेसने केली होती. अशीच दुसरी एक पोस्टही टाकण्यात आली होती आणि त्यात हा क्रमांक 9512 असा आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच रॉय यांनीही भाजपच्या महाभरतीला तात्विक आधार देण्याचा प्रयत्न केला.भाजप हा एक विशाल पक्ष आहे आणि त्यात कोणालाही सामावून घेता येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राप्रमाणेच बंगालमध्येही भाजपमध्ये नेते व कार्यकर्त्यांची आयात जोरात आहे. तृणमूलच्या रायदिघी येथील आमदार देबश्री रॉय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात आहे. एकट्या देबश्री रॉयच नव्हे तर तृणमूलचे अनेक आमदार आणि मंत्री भाजपशी सतत संपर्कात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

अशा प्रकारे पूर्वेपासून पश्चिम टोकापर्यंत भाजपमध्ये भरती चालू आहे आणि ती भरती योग्य असल्याचे सिद्ध करण्यात नेते मंडळी गुंतली आहे. पक्षाचे दार ठोठावणाऱ्या कोणालाही आत घ्यायला ते उतावीळ आहेत. आता ही भरती खोगीरभरती ठरू नये, याची काळजी या नेत्यांना घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment