रेड लेबलच्या ‘त्या’ जाहिरातीने दुखावल्या हिंदुंच्या भावना


नवी दिल्ली – सोशल मीडियावर होळीच्या मुहूर्तावर ‘सर्फ एक्सल’च्या जाहिरातीवरुन ट्रोल झालेली हिंदुस्तान यूनिलीव्हर कंपनी आता पुन्हा एकदा चर्चेत असून कंपनीच्या ‘ब्रूक बॉन्ड रेड लेबल टी’ या ब्रँडला यावेळी सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या आधी ही जाहिरात कंपनीने रिलीज केली होती, पण ती जाहिरात एका वर्षानंतर चर्चेत आली आहे आणि #BoycottRedLabel ट्विटरवर टॉप ट्रेंड होत आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्य या जाहिरातीत दाखवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. पण, ही जाहिरात अनेक नेटकऱ्यांना रुचलेली नाही. हिंदूंच्या भावना या जाहिरातीतून दुखावल्या जात आहेत, नेहमी हिंदूंनाच का शिकवण दिली जाते अशाप्रकारचे ट्विट करत नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.

या जाहिरातीत, एक हिंदू व्यक्ती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका मुस्लीम मूर्तीकाराकडे जातो. यावेळी दोघांमध्ये चर्चा होते आणि तो हिंदू व्यक्ती अखेरीस एक मूर्ती घेण्याचे ठरवतो. तेवढ्यात तो मुस्लीम मूर्तीकार ‘अजान’चा आवाज ऐकून डोक्यावर टोपी घालतो. तो हिंदू ग्राहक मूर्तीकार मुस्लीम असल्याचे पाहून जरा विचारात पडलेला या जाहिरातीत दाखवला असून तो त्यामुळे तेथून बाप्पाची मूर्ती खरेदी करणे टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे या जाहिरातीत दाखवले आहे. काही महत्त्वाचे काम आज असून मी उद्या येतो, असं म्हणत तो ग्राहक तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला किमान चहा तरी प्यावा अशी विनंती मूर्तीकार करतो. मूर्तीकार चहा पिताना त्या ग्राहकाला, नमाज पठण करणारे हात जर बाप्पाची मूर्ती सजवणार असतील तर आश्चर्य वाटणारच ना… असे म्हणतो. त्यावर हेच काम तुम्ही का करतात? असे तो ग्राहक विचारतो. ही देखील एकप्रकारची ईश्वरसेवा असल्याचे त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हा मूर्तीकार म्हणतो. तो ग्राहक मूर्तीकाराच्या या बोलण्याने प्रभावित होऊन बाप्पाची मूर्ती लगेच खरेदी करण्यास तयार होतो, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे.

Leave a Comment