बोलून अडचण, न बोलून खोळंबा


काँग्रेसच्या नेत्यांनी मोदीस्तुतीची मालिका सुरू केल्यामुळे पक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. आधीच अनेक ज्येष्ठांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, अनेकांनी पक्ष सोडला आणि उरलेल्यांनी आपल्या मुख्य विरोधकाच्याच आरत्या ओवाळायला सुरूवात केली. त्यामुळे या नेत्यांना गप्प बसवण्यासाठी जुने-जाणते नेते पुढे आले आहेत. यातून अनेक नेत्यांची गोची झाली आहे.

केरळमधील खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्वान म्हणून ओळख मिळवलेले शशी थरूर हे अशा नेत्यांमधील ताजे नाव. थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्यामुळे त्यांचे सहकारी नाराज झाले आहेत. थरुर यांना मिळालेले यश त्यांच्या विद्वत्तेमुळे नव्हे तर मोदींना केलेल्या विरोधामुळे आहे, हे त्यांना लक्षात आणून देण्यात आले आहे. केरळमधील काँग्रेसचे आणखी एक खासदार के. मुरलीधरन यांनी थरूर यांच्यावर हा हल्ला चढवला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे,’ असे वक्तव्य थरूर यांनी गेल्या आठवड्यात केले होते. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे काश्मीरप्रश्नात मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचा दावा केला होता. तेव्हाही थरूर यांनी मोदी यांचे समर्थन केले होते. या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला संसदेत व संसदेबाहेर कोंडीत पकडले असताना त्यांनी या प्रकरणी मोदींची पाठराखण केली होती. ‘मोदी केव्हाच काश्मीरप्रश्नात अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती करणार नाहीत. हे अशक्य आहे,’ असे थरूर यांनी ट्विट केले होते. त्यांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

केरळ प्रदेश कॉंग्रेसने (केपीसीसी) शशी थरूर यांच्याकडे याचा जाब विचारला होता. थरूर यांच्याकडून स्पष्टीकरण आल्यानंतर कारवाई करू, असे केपीसीसीचे अध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी सांगितले होते. इतकेच नव्हे तर केपीसीसीने इतर नेत्यांनाही जाहीर वक्तव्य करणे थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपण पंतप्रधानांचे कधीच समर्थन केले नव्हते, प्रत्यक्षात आपण भाजप सरकारचे कठोर टीकाकार असल्याचे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले होते आणि ते केपीसीसीने मान्य केले होते.

त्यापूर्वी मोदींचे कौतुक करणारी फेसबुक पोस्ट टाकल्याबद्दल केपीसीसीने जून महिन्यात ए. पी. अब्दुल्ला कुट्टी या नेत्याची हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

या पार्श्वभूमीवर थरूर यांनी शुक्रवारी मोदी यांची परत स्तुती केली. प्रत्येक भारतीय नागरिकाने मातृभाषेशिवाय आणखी एक भाषा शिकावी, असे आवाहन मोदींनी केले होते. मोदी आणि भाजपच्या हिंदी वर्चस्ववादापेक्षा ही भूमिका असल्याचे सांगून थरूर यांनी त्याचे कौतुक केले होते. त्यावरून मुरलीधरन नाराज झाले.

“ऑक्सफोर्ड इंग्लिशमुळे नव्हे तर मोदीविरोधी भूमिकेमुळे पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला तिरुअनंतपुरमची लोकसभेची जागा जिंकता आली,” असे मुरलीधरन म्हणाले. त्यांनी थरूर यांचे थेट नाव घेतले नाही तरी ते कोणाबद्दल बोलत आहेत हे सर्वांना कळाले. कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार दिवंगत ए. चार्ल्स यांनी ऑक्सफोर्डची इंग्रजी शिकली नव्हती तरीही तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून त्यांनी तीनदा विजय मिळवला होता, याची आठवण त्यांनी थरूरना करून दिली. मुरलीधरन हे माजी मुख्यमंत्री करुणाकरन यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे.
मजेची गोष्ट म्हणजे मुरलीधरन यांनी स्वतः काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्ष सोडला होता. परंतु काँग्रेस सोडला असला तरी मी भाजपाला कधीही पाठिंबा दिला नव्हता किंवा त्याची बाजू घेतली नाही, असे त्यांनी सांगितले.

थरूर यांना धारेवर धरणारे ते पहिलेच किंवा एकटे नेते नाहीत. पक्षाचे आणखी एक खासदार बेनी बेहनन यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. ज्यांना मोदींचे कौतुक करायचे होते त्यांनी भाजपमध्ये जावे. पंतप्रधानांची स्तुती करणे हे कॉंग्रेसचे काम नाही, असे ते म्हणाले होते. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला आणि खासदार टी.एन. प्रतापन हेही थरूर यांच्याविरोधात उतरले आहेत.

जयराम रमेश, शशी थरूर आणि अभिषेक सिंघवी हे तीन काँग्रेसचे शहाणे मानले जाणारे नेते. त्यांनी मोदींची स्तुती केल्यामुळे वास्तविक संपूर्ण पक्षच विचलित झाला आहे. जर विरोधी पक्षांनीच सत्ताधाऱ्यांचे कौतुक सुरू केले तर लोकशाही नष्ट होईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आनंद शर्मा मंगळवारी म्हणाले. ते खरे आहे. पण मग केवळ टीका केल्यामुळे लोक गांभीर्याने घेत नाहीत, ही समस्याही या मंडळींपुढे आहे. त्यामुळे ज्यांना आपली मते व्यक्त करायची आहेत त्यांची अवस्था बोलून अडचण, न बोलून खोळंबा अशी झाली आहे.

Leave a Comment