काय आहे ‘शिगीर आयडॉल’चे रहस्य ?

idol
पुरातत्ववेत्त्यांना सापडलेली ही मूर्ती तब्बल अकरा हजार वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीवर काही अक्षरे, संकेत कोरलेले आहेत. ही अक्षरे वाचण्याचा आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरु आहे. ‘शिगीर आयडॉल’ या नावाने ओळखली जाणारी ही मूर्ती नेमकी कोणी बनविली हे ही रहस्यच होऊन बसले आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या अंदाजानुसार ही मूर्ती अकरा हजार वर्षांपूर्वीची आहे. लाकडाने बनेलेली ही इतकी प्राचीन मूर्ती आणि त्यावरील लिखाण इतकी शतके उलटून गेल्यानंतरही व्यवस्थित टिकून आहे, ही देखील आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. ही मूर्ती १८९० साली सायबेरियातील शिगीर प्रांतामध्ये सापडली असून, त्यावरून या मूर्तीचे नाव ‘शिगीर आयडॉल’ पडले आहे.
idol1
सायबेरियाच्या शिगीर प्रांतामध्ये सोन्याची खाण असून, तिथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये ही मूर्ती सापडली होती. तेव्हा या मूर्तीची थोडीफार मोडतोड झाली होती. जेव्हा या मूर्तीला पुन्हा जोडले गेले, तेव्हा या मूर्तीची उंची सतरा फुटांची असल्याचे दिसून आले. त्यानंतर पुरातत्ववेत्त्यांनी या मूर्तीची पाहणी करून ही मूर्ती साडे नऊ हजार वर्षे जुनी असल्याचे सांगितले. पण अलीकडच्या काळामध्ये या मूर्तीवर ‘रेडियो कार्बन डेटिंग’ प्रक्रिया केली गेल्यानंतर ही मूर्ती वास्तविक अकरा हजार वर्षांपूर्वीची असल्याचे निश्चित निदान करण्यात आले आहे.
idol2
या मूर्तीची बनावट काहीशी वेगळी असून, ही काहीशी ‘अॅब्सट्रॅक्ट’ (अमूर्त मूर्तीकला) आहे. प्राचीन लार्च वृक्षाच्या खोडाचा वापर करून या मूर्तीचा चेहरा बनविण्यात आला आहे. या मूर्तीच्या चेहऱ्यावर डोळे, कान, नाक, तोंड इत्यादी कोरले असले, तरी खांद्यांपासून पायांपर्यंत ही मूर्ती एकदम सरळ सपाट, आयताकार आहे. या मूर्तीची विशेषता ही कि या मूर्तीला केवळ एकच नाही, तर अनेक चेहरे असून, त्यापैकी एक चेहरा ‘थ्री डायमेन्शनल’ आहे. सध्या ही मूर्ती रशियातील येस्तेरीनबर्ग या ठिकाणी वस्तुसंग्रहालयामध्ये पहावयास मिळते.
idol3
या मूर्तीच्या चारी बाजूंना अज्ञात लिपीमध्ये काही तरी लिहिलेले असून, हे लिखाण नेमके काय असावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पुरातत्ववेत्ते करीत आहेत. काही अंदाजांच्या नुसार ही मूर्ती ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आली, त्याबद्दलची माहिती या मूर्तीवर आहे, तर काहींच्या मते एका खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग यावर रेखित आहे. काहींच्या मते हे लिखाण म्हणजे देवी-देवतांची स्तुती आहे, तर काहींच्या मते नकारात्मक शक्ती दूर ठेवण्याचे मंत्र या वर लिहिलेले आहेत. हे लिखाण नेमके आहे तरी काय याचे अंदाज पुरातत्ववेत्ते आणि अभ्यासक गेली अनेक वर्षे लावत आहेत, पण या रहस्याची उकल आजतागायत होऊ शकलेली नाही.

Leave a Comment