भाजप सदस्यत्वाचा महापूर आताच का?


काही दिवसांपूर्वीची गोष्ट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक टोमणा मारला होता. “भाजपाकडे कोणती वॉशिंग पावडर आहे, की भ्रष्टाचारी नेते तिकडे जाताच स्वच्छ होतात,” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते.त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितकेच जोरदार उत्तर दिले होते.

“त्यांच्या पक्षात भ्रष्टाचाराची घाण आहे आणि सफाईची गरज आहे. भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही तर विकासाचे डॅशिंग रसायन आहे, ज्यापुढे विरोधक निष्प्रभ आहे,” असे ते म्हणाले होते.

या दोघांचा हा कलगीतुरा रंगला त्याला कारणही तसेच होते. भारतीय जनता पक्षात सर्वपक्षीय नेत्यांची रीघ लागली आहे. त्यामुळे राज्यात पक्षांतर हा परवलीचा शब्द बनला आहे. सुमारे एक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप व शिवसेनेशी घरोबा केला आहे. त्यातही भाजपला जरा जास्तच पसंती दिली जातेय. राष्ट्रवादीतून अनेक नेते मंडळींनी भाजपत उडी घेतली. यात आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक या दिग्गजांचा समावेश आहे. या नेत्यांच्या पक्षांतरामुळे महाभरती हा शब्दही लोकप्रिय झाला आहे. खुद्द भाजप नेते हा शब्द वारंवार वापरू लागलेत. अशातच एक बातमी आली, की भाजप सदस्यांची संख्या 18 कोटींवर पोचली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सध्या मिरवत आहे.

एक जमाना असा होता, की चीन आणि रशियातील साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्ष हे जगातील सर्वात पक्ष गणले जात. अर्थात त्याचे कारण वेगळेच होते कारण त्या देशांत दुसऱ्या पक्षांना टिकूच दिले जात नव्हते. या पक्षांचे कोट्यवधी सदस्य होते. रशियात साम्यवादी कार्यकर्त्यांची संख्या दोन कोटी होती तर चीनमध्ये ही संख्या नऊ कोटी एवढी होती. भारतापुरते बोलायचे झाले तर काँग्रेस हा भारताचाच नव्हे तर जगातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष होता. मात्र आता तो केवळ जुना पक्ष राहिला आहे. मात्र आता भाजपने हा मान मिळवला आहे.

भाजपची सदस्य संख्या इतके दिवस 11 कोटी होती. गेल्या काही दिवसांत भाजपने राबवलेल्या सदस्य मोहिमेमुळे यात सात कोटींची भर पडली आणि ती 18 कोटींवर गेली. सात कोटी लोक ही थोडी-थोडकी संख्या नाही. अनेक मोठ्या देशांची लोकसंख्याही यापेक्षा कमी आहे. गंमत म्हणजे खुद्द भाजपला जी संख्या अपेक्षित होती त्यापेक्षा अडीच पट लोक पक्षात आले आहेत. हा पक्षात आलेला महापूरच म्हणायला हवा.

एक लोकशाही देश असल्यामुळे भारतीय लोकांना कोणत्या पक्षाचे सदस्य व्हावे, याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यासाठी शेकडो पक्षांचे पर्याय लोकांना उपलब्ध आहेत. तरीही भाजपमध्ये सदस्यांचा हा पूर का येत आहे? कारण त्या पक्षाकडे आज सत्ता आहे आणि सामान्य लोकांना याच पक्षात आपले भविष्य उज्ज्वल असल्याचे वाटत आहे. तसेच काश्मिरबाबतचे कलम 370 निष्प्रभ केल्याने अनेक नागरिकांच्या मनात पक्षाने स्थान मिळवले आहे.

भाजप या पक्षात येणारे हे लोक पक्षाची विचारसरणी पसंत पडल्यामुळे किंवा पटल्यामुळे येत नाहीत. त्यामुळेच या वाढीव आकड्यामुळे हरखलेल्या नेत्यांना हे माहीत असायला हवे, की सत्ता जाताच ही गर्दी दुसरीकडे वळू शकते. त्यामुळे या कोट्यवधी नवीन कारकर्त्यांना कामाला लावणे हे पक्षापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.

ही गर्दी पाहून खुद्द भाजपमधील मंडळीही अस्वस्थ आहेत. पक्षाचे जेष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीच याबाबत दोन वर्षांपूर्वी पक्ष नेतृत्वाचे कान टोचले होते. यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. मात्र, आता तसे होत नाही. “भाजपमध्ये कोणाला घेताना त्याच्या बाबी तपासल्या जायच्या. आज मात्र आपल्या पक्षात ज्याच्यावर खूनाचा गुन्हा आहे आणि जो वेडा आहे. या दोन व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाला प्रवेश दिला जातो,” अशा शब्दांत बागडे यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. मात्र त्या कानपिचक्या कानाआड करण्यातही भाजपचे नेते यशस्वी ठरले आहेत.

दोन-अडीच दशकांपूर्वी शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्या पक्षात निष्ठावंत आणि बाहेरचे असा नेत्यांमध्ये भेद केला जायचा. त्यातून काँग्रेसमध्ये गटबाजी माजली आणि खरे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले. सध्याच्या भाजपकडे पाहताना ‘कमळाबाई’ही त्याच मार्गाने जात नाही ना, असा प्रश्न मनात उभा राहतो.

Leave a Comment