बहुगुणकारी शेवग्याच्या बिया


सुंदर आणि नितळ त्वचा असो, किंवा लांबसडक, घनदाट, निरोगी केस असोत, या दोन्हीसाठी आणि इतरही बाबतीत शेवग्याच्या बिया अतिशय उपयुक्त समजल्या जातात. किंबहुना उत्तम त्वचा आणि सुंदर केस हवे असल्यास आहाराध्ये नियमित शेवग्याच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. शेवग्याच्या शेंगेच्या आत असलेल्या या बिया शेवग्याच्या शेंगा वाफवून घेऊन खाता येऊ शकतात. या शेंगांच्या बिया कच्च्या खाण्याची पद्धतही काही ठिकाणी अस्तित्वात असली, तरी बहुतके ठिकाणी या शेंगा वाफवून घेऊन आमटी, किंवा सांबार सारख्या पदार्थांमध्ये घालून किंवा नुसत्याच खाल्ल्या जाण्याची पद्धत आहे. मात्र शेवग्याच्या शेंगांच्या बियांचे सेवन करायचे असल्यास शेवग्याच्या शेंगेतील बिया वाळून घेऊन त्याची पूड करावी आणि ही पूड उपयोगात आणावी.

शेवगा अतिशय पौष्टिक असून यांच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. शेवग्याच्या बियांमध्ये प्रथिने, अँटी ऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स, फ्लॅवनॉइड्स, फायटोन्यूट्रीयंट्स, कर्बोदके, अ व क जीवनसत्वे, पोटॅशियम, लोह, फायबर, आणि अमिनो अॅसिड्स असतात. यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण नगण्य असून, शरीराचे सौंदर्य वाढविण्यापासून, अनेक विकारांवर अनेक बाबतीत शेवग्याच्या बिया उपयुक्त आहेत.

शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट होते. यामध्ये असलेले क जीवनसत्व शरीराचे अनेक तऱ्हेच्या जंतूंच्या संक्रमणापासून दूर ठेवते. यामध्ये असलेले डायटरी फायबर पोट जास्त काळ भरलेले ठेऊन वारंवार भुकेची होणारी भावना कमी करीत असल्याने, व अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास सहायक असल्याने, ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल, त्यांच्यासाठी देखील शेवग्याच्या बिया उपयुक्त आहेत. आजकाल बाजारामध्ये शेवग्याची पावडरही उपलब्ध आहे. गरम पाण्यामध्ये ही पावडर घालून दररोज रात्री याचे सेवन केल्यास निद्रानाशाचा विकार दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने शारीरिक थकवा दूर होऊन शरीरामध्ये चैतन्य निर्माण होते.

शेवग्याच्या बिया वाळवून त्याची पूड तयार करावी. यामध्ये झिंक मुबलक प्रमाणामध्ये असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच शेवग्याच्या बियांच्या पावडरचे सेवन मधुमेहींसाठी लाभदायक आहे. शेवग्याच्या बियांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठीही अतिशय उत्तम असून, त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करण्यास सक्षम असलेले पोटॅशियम शेवग्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असल्याने याच्या नियमित सेवनाने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ‘ब्लॉकेज’चा धोका टाळला जाऊ शकतो. या साठी दररोज रात्री शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये भिजत घालून हे पाणी सकाळी उठल्यावर प्यायल्याने फायदा होतो. शेवग्याच्या बियांच्या प्रमाणे शेवग्याची पानेही अतिशय उपयुक्त असून ही पाने पाण्यासोबत बारीक वाटून त्याची पेस्ट त्वचेवर लावली असता, त्वचेवरील सुरकुत्या, मुरुमे-पुटकुळ्या, उन्हामुळे त्वचेवर आलेले काळसर डाग, एखाद्या अॅलर्जीमुळे आलेली रॅश, इत्यादी नाहीसे होण्यास मदत होते. शेवग्याच्या बियांमध्ये लोह मुबलक मात्रेमध्ये असल्याने ज्यांना अनिमिया आहे, व त्यामुळे ज्यांना अशक्तपणा वाटत असतो, त्यांच्यासाठी या बियांचे सेवन उपयुक्त आहे. शेवग्याच्या बियांमध्ये पालकामध्ये असते त्यापेक्षा पंचवीस टक्के अधिक लोह आहे. यांच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढते.

शेवग्याच्या बियांचे सेवन किती केले जावे, हे त्या व्यक्तीची सर्वसाधारण प्रकृती, वय आणि वजन या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणूनच शेवग्याच्या बियांच्या पावडरचे सेवन सुरु करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. शेवग्याच्या बियांचे सेवन पावडरच्या रूपात केले जाऊ शकते. यासाठी शेवग्याची पाने आणि बिया वाळवून त्यांची वेगवेगळी पूड करावी. दररोज सकाळी मोरिंगा (शेवगा) टीच्या रूपात शेवग्याच्या बियांचे आणि पानांचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी दोन कप पाणी उकळण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा पानांची पूड आणि एक चमचा बियांची पूड घालावी. या मिश्रणाला एक उकळी आली, की गॅस बंद करून हे मिश्रण काही सेकंद मुरु द्यावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घेऊन यामध्ये आवडत असल्यास मध घालून मोरिंगा टीचा आस्वाद घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment