जाणून घेऊ या पॅरासिटामोलचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम


आपल्या नित्याच्या जीवनामध्ये असे अनेक दिवस असतात, ज्यावेळी नित्याच्या कामांमध्ये आणखी किती तरी कामांची भर पडते. मग ती घरातील एखाद्या कार्यक्रमामुळे असो, किंवा ठरल्यापेक्षा अधिक, अगदी अचानक कराव्या लागलेल्या मीटींग्जमुळे असो, असल्या दिवसभराच्या अविरत धावपळीनंतर डोके दुखणे, अंग दुखणे, अंगात कणकण आल्यासारखे वाटणे, थकवा येणे असे अनुभव आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी नक्कीच घेतले असतील. अश्या वेळी आपण फारसा विचार न करता पटकन एक पॅरासिटामोलची गोळी घेऊन मोकळे होतो. आपल्याला होत असलेली अंगदुखी, बारीक ताप, इत्यादी कमी करण्याच्या उद्देशाने घेतले जाणारे हे औषध बाजारामध्ये सहज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय उपलब्ध तर असतेच आणि आपल्यापैकी बहुतेकांच्या घरामध्येही हमखास सापडते. मूळ ‘अॅसेटामिनोफेन’ या नावाने फार्मसीच्या भाषेमध्ये ओळखले जाणारे हे औषध सामान्य भाषेमध्ये पॅरासिटामोल म्हणून आपल्या परिचयाचे आहे. पण याची सहज उपलब्धता आणि सर्दीपासून तापापर्यंत बारीक सारीक सर्वच व्याधींवर बिनदिक्कत घेतले जाणारे हे औषध संपूर्णपणे सुरक्षित आहे असे मात्र नाही.

अलीकडच्या काळामध्ये पॅरासिटामोलचे सातत्याने केले जाणारे सेवन लिव्हरसाठी घातक असू शकते असे निदान संशोधनाच्या माध्यमातून झाल्यानंतर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग असोसिएशनने ३२५ मिलीग्राम पेक्षा अधिक पॅरासिटामोल असलेली औषधे वापरताना त्याद्वारे कोणतेही दुष्परिणाम रुग्णाला सहन करावे लागू नयेत यासाठी सर्वच वैद्यकीय तज्ञांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मर्यादित प्रमाणामध्ये या औषधाचा वापर केला गेला असता हे औषध संपूर्णपणे सुरक्षित असले असा समज जरी रूढ असला, तरी या औषधाच्या सततच्या वापराचे घातक परिणाम ही होत असल्याचे निदान शास्त्रज्ञांनी केले आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये सामान्य अंगदुखी, ताप, यांवर लागू पडणारी अॅस्पिरीन आणि इबुप्रोफेन सारखी औषधे जरी बाजामध्ये उपलब्ध असली, तरी यांच्या सतत वापराने गॅस्ट्रीक अल्सर्सची समस्या रुग्णांमध्ये दिसून येत असे. त्यावेळी वॉन मेरिंग यांनी पॅरासिटामोल हे ड्रग बाजारात आणले आणि त्याचे परिणाम इबुप्रोफेन किंवा तत्सम औषधांप्रमाणे दिसून न आल्याने हे नवे औषध बाजारामध्ये लवकरच लोकप्रियही होऊ लागले. मात्र १९६६ साली या औषधाच्या अतिवापराने एका रुग्णाचे लिव्हर खराब होऊन त्याचा मृत्यू झाला, आणि त्यामुळे पॅरासिटामोलचा वापरही संपूर्ण सुरक्षित नसल्याचे निदान झाले.

याच विषयावर २०११ साली संशोधन केले गेले असता, नॉटिंगहॅम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पॅरासिटामोल आणि इबुप्रोफेन ही औषधे सातत्याने घेणाऱ्या व्यक्तींचे, तेरा आठवडे अवलोकन केले. यामध्ये इबुप्रोफेन घेणाऱ्या पाच व्यक्तींमध्ये एका किमान एका व्यक्तीला या औषधामुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे आढळले, तर इबुप्रोफेनच्या मानाने पॅरासिटामोल अधिक सुरक्षित असल्याचे समजून त्याचा अतिवापर करणाऱ्या रुग्णांपैकी काहींमध्ये देखील हीच समस्या आढळून आली. तसेच पॅरासिटामोलच्या अतिवापराचे गंभीर दुष्परिणाम लिव्हरवरही दिसून येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पॅरासिटामोलचा ‘ओव्हरडोस’ अगदी सहज शक्य असून प्रत्येक कफ सिरप, पेनकिलर, किंवा सपोझिटरीमध्ये पॅरासिटामोलचा अंश असतोच. या औषधांचे दोन डोस जरी दिवसागणिक घेतले जात असतील, तरी आपण धोक्याची पातळी ओलांडत असतो. म्हणूनच हे औषध घेतले जाताना त्या व्यक्तीचे वय, वजन आणि एकंदर प्रकृती पाहून मगच औषधांची मात्रा निश्चित केली जाणे आवश्यक ठरते. याच कारणास्तव पॅरासिटामोल किंवा तत्सम औषधे सहज उपलब्ध असली तरी त्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे घातक ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment