‘हरामी नाल्या’तील दहशतवाद्यांना उत्तर देणार ‘मगर कमांडो’


जम्मू-काश्मिरचे भारतातील विलिनीकरण पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कलम 370 निष्प्रभ केले. तेव्हापासून भारतातील शांतता व सुव्यवस्था नष्ट करण्यासाठी पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे. या बाबत सर्व प्रयत्न फसल्यानंतर पाकिस्तान आता भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याला मदत होऊ शकते ती हरामी नाला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका मार्गाची. या मार्गावरील दहशतवाद्यांचा बंदोबस्त आता भारताचे ‘मगर कमांडो’ करणार आहेत.

कलम 370 निष्प्रभ झाल्यापासून भारताला चिथावणी देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर दररोज शस्त्रसंधि भंग केला जात आहे. त्याला फारसे यश आले नाही त्यामुळे पाकिस्तानातील काही दहशतवादी संघटना आपल्या प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याच्या बेतात आहे, असे गुप्तचर खात्याच्या अहवालात म्हटले आहे. यासाठी हे दहशतवादी सागरी मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता आहे कारण त्यांना या मार्गाचा वापर करण्याचे निर्देश पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने दिले आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एक टोळी हरामी नाल्याच्या मार्गाने भारतात आली आहे.

हा ‘हरामी नाला’ भारत- पाकिस्तान सीमेला लागून कच्छच्या सिर क्रीक या भागात आहे. सिर क्रीक हा या दोन्ही देशांमध्ये वादग्रस्त भाग असून त्याचा आकार 96 किलोमीटर आहे. सर्वसामान्य लोकांना या भागात जाण्याची पूर्ण बंदी असून येथे 8 किमी लांबीची एक दलदल आहे. हा भाग आकाराने साधारण 500 चौरस किमी आहे. प्रत्यक्ष हरामी नाला हा भारत व पाकिस्‍तानला वेगळे करणारी सागरी खाडी आहे आणि तिची लांबी 22 किमी आहे. पाकिस्ताने या वादग्रस्त खाडीला दोन किमी लांब आणि 50 मीटर रूंद कृत्रिम खाडी खोदून जोडली आहे.

घुसखोर आणि तस्करांच्या दृष्टीने हा हरामी नाला म्हणजे एक नंदनवन आहे. म्हणूनच याचे नाव ‘हरामी नाला’ असे ठेवण्यात आले आहे. येथील पाण्याची पातळी भरती-ओहोटी आणि वातावरणाच्या परिमाणामुळे सतत बदलत असते. हा खाडीचा प्रदेश अत्यंत प्रतिकूल भूप्रदेश आहे. येथील समुद्रतळ उथळ आहे आणि येथे तिवराची वने आहेत. या भागात असंख्य प्रवाह आहेत आणि ते सहसा गुडघ्यापर्यंत खोल असतात. त्यामुळे ही खाडी अत्यंत धोकादायक मानली जाते. पाकिस्तानातून येणारे दहशतवादी याच नाल्याच्या मार्गाने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांत या भागात पाकिस्तानी मच्छिमारांनी आंतरराष्ट्रीय जलसीमा उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्‍तानी दहशतवाद्यांनी 2008 मध्ये याच सिर क्रीकमधून ‘कुबेर’ ही भारतीय मच्छिमारी नौका हस्तगत केली होती. तेथून ते गुजरातला आले आणि मुंबईवर हल्ला केला, असे म्हटले जाते.

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाच दिवसांपूर्वी गुजरातच्या कच्छ भागात पाकिस्तानातील एक मच्छिमार नौका जप्त केली. त्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. ही नौका याच हरामी नाल्याजवळ पकडण्यात आली. यापूर्वी नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनीही गुप्तचर खात्याच्या हवाल्यानेच सांगितले होते, की जैश-ए-मोहम्‍मद या संघटनेने आपली सागरी टोळी बनवली आहे आणि ती दहशतवाद्यांना जलमार्गाने येऊन हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहे.

आता या पाकिस्तान-प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी बीएसएफने सिर क्रीक भागात ‘क्रीक क्रोकोडाईल कमांडो’ पथके तैनात केली आहेत. बीएसएफची हे अत्यंत कुशल दल मानले जाते. नौकांमधून या भागात गस्त घालणे कठीण आहे म्हणून खाडी क्षेत्रातील सीमेवरील चौकींवर ऑल-टेरेन वाहने (एटीव्ही) तैनात केले आहेत, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. हे कमांडो पाणी आणि जमिनीवरील लढाईचे चांगले प्रशिक्षण घेत आहेत आणि सीमेपलीकडून होणारी कोणतीही आगळीक परतवून लावू शकतात. क्रीक क्रोकोडाईल्स कमांडो हे बीएसएफचे पहिले कमांडो युनिट आहे आणि त्याची स्थापना 2014 मध्ये झाली होती.

गुजरातच्या किनाऱ्यावर दीनदयाल पोर्ट ट्रस्ट (कांडला) यासहित सर्व महत्वाच्या बंदरांवर नेव्ही कमांडोही तैनात करण्यात आल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनाही अलीकडेच किनारपट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी सीमेवर अतिरिक्त सैन्यही पाठविण्यात आले आहे. या सर्व उपायांमुळे दहशतवादी हल्ल्याचा धोका किमान सध्या तरी टळला असावा, अशी आशा करायला हरकत नाही.

Leave a Comment