चहाचा चोथा असो, वा कॉफीचा, त्याचा करावा असाही उपयोग


आपल्यापैकी बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहा किंवा कॉफीने होत असते. चहा किंवा कॉफी बनविण्यास्ठी त्याच्या बिया दळल्या, की त्याचा चोथा बहुतेकवेळी टाकूनच दिला जात असतो. मात्र चोथा दळवून आणलेल्या कॉफीच्या बियांचा असो, किंवा चहाचा असो, हा आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकतो. कॉफीच्या बियांचा चोथा एक उत्तम ‘स्किन एक्सफोलियेटर’ आहे. तसेच आपल्या लाकडी फर्निचरसाठी डाय (रंग) तयार करण्यासाठी देखील हा चोथा वापरला जाऊ शकतो. कॉफीप्रमाणेच चहाचा चोथा देखील अतिशय उपयुक्त असून, याच्या वापराने पायांना येत असणारी दुर्गंधी दूर होते. त्वचेवरील मुरुमे दूर करण्यासही हा चोथा सहायक असून, एखाद्या जागेतील आर्द्रता कमी करण्यासही हा चोथा सहायक असतो. म्हणूनच कॉफीचा किंवा चहाचा चोथा टाकून देण्याच्या ऐवजी अश्या प्रकारे उपयोगात आणण्याचा विचार जरूर करावा. चहा किंवा कॉफीच्या चोथ्याचा वापर कश्याप्रकारे करता येऊ शकतो हे सविस्तर पाहू या.

त्वचेवरील मृत पेशींचा थर वेळोवेळी हटविला गेला नाही, तर काही काळाने त्वचा निस्तेज दिसू लागते. तसेच या थरामुळे त्वचेवरील रंध्रे ‘ब्लॉक’ होऊन ‘अॅक्ने’चा त्रास सुरु होतो. म्हणूनच त्वचेवरील मृत पेशींचा थर हटविला जाणे गरजेचे असते. पण यासाठी कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागडी फेशियल्स करविण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही. यासाठी कॉफीच्या बिया दळविल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो, त्या पैकी एक चमचा चोथा घेऊन त्यामध्ये खोबरेल तेल घालावे. हे मिश्रण चांगले एकजीव करून चेहऱ्यावर सावकाश चोळून लावावे. त्यानंतर हे मिश्रण सुमारे पंधरा मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्यावे व नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. या मिश्रणाचा वापर ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी लिप बाम म्हणूनही करता येतो. कॉफीच्या बियांचा चोथा कोरडाच एका लहानश्या कपमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीजमध्ये क्वचित येणारी दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होते.

अनेकदा बाहेर कडक उन्हामध्ये बराच वेळ फिरल्यानंतर त्वचा कोरडी होते, व त्वचेची आग होऊ लागते. अश्या वेळी चहाची पूड आपल्या मदतीला येऊ शकते. यासाठी तीन कप पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर घालावी. हे मिश्रण पंधरा मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करावा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यानंतर या पाण्यामध्ये एखादा स्वच्छ रूमाल बुडवावा. हा ओला रुमाल थोडासा पिळून घेऊन त्वचेवर जिथे आग होत असेल, तिथे ठेवावा. यामुळे तीव्र उन्हाने त्वचेवर आलेली लाली, आणि त्वचेची होणारी आग कमी होण्यास मदत होते. याच चहाच्या मिश्रणामध्ये काही काळ पावले बुडवून ठेवली असता, सतत बुटांमध्ये बंद असलेल्या पावलांना येणारी दुर्गंधी नष्ट होते.

अनेकदा आपल्या घरातील लाकडी फर्निचरवर काही कारणाने बारीकसारीक ओरखडे उठत असतात. हे ओरखडे दिसू नयेत यासाठी कॉफीच्या बियांचा चोथा आणि पाणी वापरून घट्टसर मिश्रण तयार करावे. हे मिश्रण कॉटन ‘बड’च्या सहाय्याने ओरखड्यांवर लावावे आणि पंधरा मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर कोरड्या कपड्याने हे मिश्रण पुसून काढावे. यामुळे फर्निचरवरील ओरखडे नाहीसे झालेले दिसतील. मात्र हा उपाय अर्थातच मुळात कॉफी किंवा गडद कलरच्या फर्निचरवरच करता येतो. चहाचा चोथा आर्द्रता शोषून घेणारा असून, याचा वापर कपाटांमध्ये किंवा घरामध्ये असलेल्या एखाद्या शेल्फमध्ये करता येईल. यासाठी चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा उन्हामध्ये चांगला वाळवून घ्यावा. हा चोथा एका लहानश्या कापडामध्ये बांधून ही पुरचुंडी कपाटामध्ये ठेवावी. यामुळे कपाटातील आर्द्रता शोषली जाईल.

Leave a Comment