या सेलिब्रिटीजना या कारणास्तव गमवाव्या लागल्या होत्या नोकऱ्या !


‘सेलिब्रिटी’ म्हटले की त्यांच्या भोवतीचे प्रसिद्धीचे वलय, श्रीमंती थाट, त्यांचे वैभव, ऐषारामी जीवनशैली, असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र या सेलिब्रिटीजना, ते सध्या जगत असलेले आयुष्य जन्मल्यापासून लाभलेले नाही. किंबहुना हे सेलिब्रिटीज प्रसिद्धीच्या शिखरावर आरूढ होण्यापूर्वी तुमच्या आमच्यासारखेच सर्वसामान्य लोक होते. इतरांप्रमाणेच कुठली ना कुठली नोकरी करीत आपली गुजराण करीत होते. अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नोकरी गमवावीही लागली होती. यांच्या आयुष्यांमध्ये देखील त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, अनेकदा अपयशी देखील व्हावे लागले. अश्याच काही सेलिब्रिटीजच्या ‘सामान्य आयुष्यातील अपयशा’ची कहाणी खास माझा पेपरच्या वाचकांसाठी. या कहाण्या अर्थातच ही मंडळी प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या त्यांच्या आयुष्याशी निगडित आहेत.

सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते लायम नीसन अभिनयक्षेत्रामध्ये येण्यापूर्वी शिक्षक म्हणून काम करीत होते. एके दिवशी त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या बॅगमधून लांबलचक सुरा काढून नीसन यांना धमकावण्यास सुरुवात केली असता, नीसन यांनी जोराने त्या विद्यार्थ्याच्या नाकावर ठोसा मारला. हे कृत्य नीसन यांनी स्वतःच्या बचावाकरिता केले असले, तरी त्यापायी त्यांना नोकरीला मुकावे लागले. नीसन यांनी एके काळी गिनीस ब्र्युअरीमध्ये ‘फोर्कलिफ्टर’ म्हणूनही काम केलेले आहे.

‘द वूल्वरीन’, ‘एक्स मेन’ फेम सुप्रसिद्ध अभिनेते ह्यु जॅकमन यांच्या नावे सर्वाधिक काळासाठी मार्व्हल सुपरहिरोची भूमिका साकारल्याचा विक्रम गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदलेला आहे. मात्र अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी तरुणपणी ह्यु दारोदार ब्रोशर्स आणि पॅम्प्लेट्स वाटण्याचे काम करीत असत. त्यांनतर ‘सेव्हन-इलेवन’ नामक स्टोरमध्ये त्यांना नोकरीमिळाली. ग्राहकांना एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी राजी करणे हे जरी ह्यु यांना सहजसाध्य असले, तरी त्यासाठी ग्राहकांशी अति बोलत बसल्याचे सांगून त्यांची नोकरीवरून हकालपट्टी करण्यात आली होती.

अमेरिकन अॅनिमेटेड चित्रपटांचे जनक समजले जाणारे वॉल्ट डिझनी हाय स्कूलमध्ये असताना त्यांना कॅन्सस सिटी स्टार नामक वृत्तपत्रासाठी चित्रे काढण्याचे काम मिळाले. मात्र या वृत्तपत्राच्या संपादकांच्या मते डिझनी यांच्याकडे कल्पनाशक्तीचा अभाव असल्याने हे काम त्यांना जमणार नाही असे ठरवून त्यांना या कामावरून काढून टाकण्यात आले. सुप्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’ मालिकेच्या लेखिका जोअॅन के राऊलिंग लेखिका म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी एका कार्यालयामध्ये सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. मात्र कामाच्या वेळेतही राऊलिंग यांचे सर्व चित्त त्यांच्या कथा लिहिण्यातच असे, आणि त्यामुळे कामाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असे. अखेरीस त्यांची या नोकरीतून मुक्तता करण्यात आली.

Leave a Comment