केसांचे ‘स्ट्रेटनिंग’ केल्याने होऊ शकतात हे दुष्परिणाम

hair
केसांच्या निरनिराळ्या केशभूषा करविण्याबरोबरच आजकाल केसांवर तात्पुरत्या प्रक्रिया करून केसांचे रूप संपूर्णपणे बदलून टाकण्याची फॅशनदेखील खूपच चलनामध्ये आहे. ज्यांचे केस कुरळे असतात, त्यांना ते ‘स्ट्रेटनिंग’च्या प्रक्रीयेद्वारे सरळ करून घेता येतात, तर ज्यांचे केस अगदी सरळ आहेत, त्यांना ते कुरळे करून घेता येतात. या सर्व प्रक्रिया पार्लरमध्ये विनासायास करता येत असल्या, तरी या प्रक्रिया वारंवार केल्याने त्यांचे काही दुष्परिणाम दिसून येण्याची देखील शक्यता असते. केसांचे ‘स्ट्रेटनिंग’ केल्याने देखील काही दुष्परिणाम दिसून येतात. केसांचे तात्पुरते स्ट्रेटनिंग घरच्याघरी उपकरणांचा वापर करून करता येते, अन्यथा जास्त काळ टिकून राहण्यासाठी तज्ञांच्या देखरेखीखाली रासायनिक प्रक्रिया करूनही करता येते.
hair1
केसांचे स्ट्रेटनिंग करीत असताना हलका धूर केसांतून निघताना पाहायला मिळतो. पण हा धूर नसून ही वाफ असते. केसांचे स्ट्रेटनिंग करीत असताना केसांमधील आर्द्रता वाफ बनून बाहेर पडत असते. केसांची आर्द्रता बाहेर पडल्यामुळे केस रुक्ष, रखरखीत कोरडे दिसू लागतात. जर स्ट्रेटनिंग तात्पुरते असेल, तर केस पुन्हा धुतल्यानंतर ते पूर्वीप्रमाणे होऊन त्यांची आर्द्रता परत येते. पण रासायनिक प्रक्रिया करून सरळ केलेले केस कोरडे पडतात, त्यामुळे या केसांना आर्द्रता परत देण्यासाठी खास प्रसाधने वापरण्याची आवश्यकता असते.
hair2
वारंवार रासायनिक प्रक्रियांद्वारे स्ट्रेटनिंग केल्याने एकस कोरडे होतातच, शिवाय ते तुटण्याचे प्रमाणही वाढते. या प्रक्रियेसाठी वापरलेल्या रसायनांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि म्हणूनच केसगळती सुरु होते. तसेच केस अतिशय कोरडे असल्याने मुळाशी न तुटता मधूनही तुटू शकतात. त्याचबरोबर केसांची ‘स्प्लिट एन्ड्स’ होऊ लागतात, म्हणजे केसांची टोके दुभंगू लागतात. त्यामुळे केस अतिशय अनाकर्षक दिसू लागतात. स्ट्रेटनिंगच्या प्रक्रियेमुळे केसांमधील नैसर्गिक तेले नाहीशी होऊन केसांची चमक नाहीशी होते. स्ट्रेटनिंग करीत असताना केसांना उपकरणांच्या मदतीने उष्णता दिली जाते. या उष्णतेमुळे केसांनाच नाही, तर केसांच्या फॉलीकल्सनाही इजा पोहोचू लागते.
hair3
वारंवार स्ट्रेटनिंग करविल्याने डोक्यामध्ये खाज सुटू लागण्याची शक्यता असते. केसांच्या मुळांशी असलेली आर्द्रता आणि नैसर्गिक तेले नाहीशी होत असून, त्यामुळे डोक्यावरील त्वचा कोरडी पडू लागते. परिणामी डोक्यामध्ये खाज सुटू लागते. तसेच या प्रक्रियांमुळे केसांचा पोतही कायमस्वरूपी बदलू शकतो. एकदा का केसांचे मूळचे स्वरूप नाहीसे झाले, की त्यानंतर अनेक उपाय करूनही केस पूर्वीप्रमाणे होण्याची शक्यता कमी असते.

Leave a Comment