क्रोएशिया मधील शापित ‘रुझिका ग्राड’

fact
क्रोएशियामधील स्लावोनिया प्रांतामध्ये एकूण ८६,००० स्वेअर फुटांच्या परिसरामध्ये ‘रुझिका ग्राड’ नामक भुईकोट किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याची उभारणी नेमकी कोणी आणि कशी केली याचा इतिहास लोकांना फारसा अचूक माहिती नसल्याने या किल्ल्याशी निगडित अनेक आख्यायिका स्थानिक रहिवाश्यांच्या कडून ऐकण्यास मिळत असतात. यांमधील एका आख्यायिकेनुसार रुझिका ग्राड या ठिकाणी एके काळी परीलोकाचे संमेलन होत असे. अनेक पऱ्या या ठिकाणी एकत्र येत असत. अनेक जादुई औषधे तयार करण्याचे काम येथे होत असे. हे काम अनेक वर्षे सुरळीत सुरु असतानाच एका धनाढ्य शाही सरदाराने या ठिकाणी मोठा किल्ला उभारण्याचे ठरविले. पण हे कळताच आपले घर आपल्या हातून जाईल याची चिंता पऱ्यांना पडली.
fact1
ठरल्याप्रमाणे या ठिकाणी किल्ल्याच्या उभारणीचे काम सुरु झाले खरे, पण हे काम तडीला जाऊ न देण्याचा निश्चय पऱ्यांनी केला. जसे या ठीकाणी बांधकाम सुरु होई, तसे आपल्या जादूच्या मदतीने हे सर्व बांधकाम पऱ्या जमीनदोस्त करीत असत. बांधकामगार दिवसाच्या वेळी जे बांधकाम करीत असत, ते रात्रीच्या वेळी नष्ट झालेले दिसे. सुरुवातीला हा काय प्रकार आहे हे कोणाच्या लक्षात येईना. पण काही काळानंतर खरा प्रकार समजल्यावर सरदाराला त्याचा संताप अनावर झाला.
fact2
पऱ्यांना या ठिकाणी प्रवेश करता येऊ नये यासाठी या सरदाराने आपल्या कामगारांच्या करवी एक भले मोठे जाळे उभे केले. रात्रीच्या वेळी पऱ्या बांधाकाम नष्ट करण्याच्या उद्देशाने येथे आल्या असता, येथे उभारलेल्या जाळ्यामध्ये रुझिका नामक परी अडकली. तिला काही केल्या या जाळ्यातून बाहेर पडता येईना. ती या जाळ्यामध्ये अडकताच सरदाराच्या माणसांनी तिला पकडले. इतर पऱ्यांना धडा शिकविण्याच्या उद्देशाने सरदाराने रुझिकाला किल्ल्याच्या भिंतीमध्ये चिणून टाकण्याचा हुकुम फर्मावला.
fact3
त्यानंतर सर्व पऱ्या येथून निघून गेल्या खऱ्या, पण जाण्यापूर्वी त्यांच्या शापाने ही भूमी शापित झाली. ठरल्याप्रमाणे किल्ला बांधून पूर्ण झाला, पण ज्यावेळी या किल्ल्यामध्ये प्रथम प्रवेश करण्यासाठी सरदाराने पाऊल उचलले, त्याचवेळी अचानक एक मोठा दगडी चिरा निसटून खाली आला आणि त्याखाली सापडून सरदाराचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्याच्या वंशाचा देखील अंत झाला. आता या सरदाराचा आणि त्याच्या वंशाचा विसर सर्वांना पडला असला, तरी रुझिकाचे नाव या किल्ल्याशी जोडले गेले, ते कायमचेच. आता रुझिका ग्राड एक भल्या मोठ्या शिळेवर उभे असून, त्याच्या भोवती पापुक नामक घनदाट अरण्य आहे. येथे जाण्यासाठी अरण्यातून वाट काढीत जावे लागते. ओराहोविका तलावापासून सुरु होणाऱ्या या अरण्यातून पायपीट करीत रुझिका ग्राड पर्यंत पोहोचता येते.

Leave a Comment