आता फॅशन आली आहे कोरियन हॅनाक्युअर फेशियलची

facial
सुंदर दिसण्यासाठी अनेक जण अनेक उपायांचा अवलंब करीत असतात. सौंदर्यप्रसाधने, मेकअपचे नवनवीन प्रकार यांच्या बरोबरच त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मसाज, फेशियल इत्यादी करण्याची पद्धतही आजमावली जात असते. या निरनिराळ्या ब्युटी थेरपीजमध्ये ही सातत्याने बदल घडून येत असतात. या थेरपीजमध्ये वापरण्यात येणारी सिरम, क्रीमही नित्य नवी पाहायला मिळत असतात. या क्रीम्समध्ये अगदी गोल्ड डस्ट पासून डायमंड डस्ट पर्यंत सर्व वस्तू वापरण्यात येत असतात. पण सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ते कोरियन हॅनाक्युअर फेशियल.
facial1
हॅनाक्युअर फेशियल हे घरच्याघरी करता येण्यासारखे असून, यामध्ये क्रीम, सिरम, स्क्रब अश्या वेगवेगळ्या वस्तू नसून, या सर्व वस्तू एकत्रितपणे जेल रूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे फेशियल चेहऱ्यावरील वयाच्या खुणा, म्हणजेच त्वचेचा निस्तेजपणा, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग, इत्यादी नाहीशा करण्यास सहायक असून, हे फेशियल जेल सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे. हे फेशियल २०१७ साली बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाले असून, हे बाजारामध्ये आणण्यापूर्वी तीन वर्षे या कंपनीने अनेक प्रयोग करून परिणामांची खात्री पटल्यानंतरच हे फेशियल जेल बाजारामध्ये आणल्याचे समजते.
facial2
हे फेशियल जेल वापरल्यानंतर केवळ एका आठवड्याच्या अवधीमध्ये फरक दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. या फेशियल जेलमध्ये अनेक नैसर्गिक, जैविक पदार्थ समाविष्ट केले गेले असून, त्वचेसाठी हितकारी पेपटाइड्स यामध्ये आहेत. तसेच ग्रीन टी, आणि कमळाच्या पानांचा अर्कही यामध्ये असल्याचे म्हटले गेले आहे. या फेशियल जेलच्या वापराने त्वचेचा पोत सुधारत असून, त्वचेला आर्द्रता प्राप्त होते. याच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा नितळ दिसू लागते.
facial3
हे फेशियल जेल बाजारामध्ये उपलब्ध झाल्यापासून लोकप्रिय ठरले आहे आणि बाजारपेठेमध्ये याला चांगली मागणी आहे. किंबहुना दर महिन्याला ही फेशियल जेल ‘आऊट ऑफ स्टॉक’ होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभिनेत्रींपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंत सर्वच महिलांमध्ये हे फेशियल जेल अतिशय लोकप्रिय ठरले आहे.

Leave a Comment