सुंदर, निरोगी केसांसाठी आजमावून पहावा बटाट्याचा रस

hair
सुंदर, निरोगी दाट केस असणे हे आरोग्याचे लक्षण समजले जाते. मग स्त्री असो, किंवा पुरुष, केस आकर्षक आणि सुंदर असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. पण आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या काळाचे परिणाम आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांवरही दिसून येत आहेत. तणावाच्या जोडीला प्रदूषण, असंतुलित आहार, शरीरामध्ये हार्मोन्सचे असंतुलन, अपुरी आणि अनियमित झोप यांचे दुष्परिणाम केसांवर दिसून येत असतात. केसांचे आरोग्य चांगले राहावे आणि केस सुंदर दिसावेत या करीता आपण अनेक प्रसाधने, व औषधांचा वापर करीत असतो. पण त्याचा आपल्याला हवा तसा उपयोग दिसून येतोच असे नाही. आपले आरोग्य, त्वचा आणि केस, निरोगी आणि सुदृढ ठेवायचे असल्यास त्या दृष्टीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहेच, पण त्याच्या जोडीला महागडी प्रसाधने वापरण्याऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब ही करता येऊ शकेल. या उपायांमध्ये वापरले जाणारे पदार्थ संपूर्णपणे नैसर्गिक असून, यांचे दुष्परिणाम दिसून येण्याचा धोका संभविण्याची शक्यता अतिशय कमी असते.
hair1
बटाटा आपल्या सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असतो. या बटाट्याचा रस केसांच्या चांगल्या वाढीला आणि केस निरोगी ठेवण्याला सहायक आहे. या रसामध्ये अनेक जीवनसत्वे असून त्यामुळे केसांच्या मुळांशी प्राणवायूचा पुरवठा होतो. बटाट्याच्या रसाने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मालिश केल्याने केसांच्या मुळांशी असणाऱ्या कोशिका सक्रीय होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. या दोन्ही गोष्टी केसांच्या वाढीकरिता सहायक आहेत. एखाद्या व्यक्तीचे केस जर प्रमाणाबाहेर तेलकट असतील, तर त्यांनी बटाट्याच्या रसाचा वापर करून पहावा. बटाट्याच्या रसामुळे केसांवरील अतिरिक्त तेल अवशोषित केले जाते.
hair2
जर केस आणि डोक्यावरील त्वचा (स्काल्प) कोरडे असतील, तर केसांमध्ये कोंडा होण्याचा धोका असतो, तसेच अति कोरडेपणामुळे केस तुटून गळू लागतात. अश्या वेळी बटाट्याच्या रसामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण केसांना लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसांमधील कोंडा नाहीसा होतो. जर केसगळती प्रमाणाबाहेर जास्त असेल, तर त्यासाठी देखील बटाट्याचा रस वापरणे सहायक ठरू शकेल. बटाट्याचा रस वापरण्याकरिता बटाटा किसून घ्यावा. हा कीस पिळून घेऊन त्याचा रस काढून घ्यावा आणि हलक्या हातांनी केसांच्या मुळांशी मालिश करीत हा रस लावावा. हा रस केसांमध्ये पंधरा मिनिटे ठेऊन मग केस नेहमी प्रमाणे धुवावेत.

Leave a Comment