या स्तुतीमागे दडलेय काय?


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. कधी कधी तर नको तेव्हाही त्यांच्यावर टीका करण्यात आली. किंबहुना मोदीविरोध हा काँग्रेसच्या नेत्यांचा एककलमी कार्यक्रम बनला. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी अचानक मोदींबद्दल मवाळधोरण स्वीकारले आणि त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली तर भुवया उंचावणारच!जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी आणि शशी थरूर या काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी अलीकडे हेच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केवळ टीका करू नये तर चांगले काम केल्याबद्दल कधीकधी त्यांची प्रशंसाही केली पाहिजे, असे त्यांनी सुचवले आहे. तसे केल्यास काँग्रेसलाच विश्वासार्हता प्राप्त करणे सोपे होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यात तथ्य आहे, मात्र त्यात काही गफलतीही आहेत.या नेत्यांच्या या घुमजाव धोरणात दोने मूलभूत गृहितके आहेत – एक म्हणजे काँग्रेसकडे विश्वासार्हता नाही आणि दुसरे म्हणजे पक्षाने स्वत:वर विश्वास दाखवण्याऐवजी मोदींना पाठिंबा देऊन आत्मविश्वास मिळवावा. 

‘मोदी म्हटले की केवळ नकारात्मक बोलू नये,’ असे सांगून रमेश यांनी मोदींच्या स्तुतीची ही मोहीम सुरू केली. त्यानंतर इतर दोघांनी त्यांची री ओढली. हे तिघेही उच्च विद्याविभूषित मानले जातात, हे विशेष. यापूर्वी कलम 370 रद्द केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग, जनार्दन तिवारी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांसारख्या नेत्यांनीही सरकारचे कौतुक करून आडून-आडून का होईना पण मोदींची स्तुती केली होतीच. खरी गोष्ट अशी आहे, की काँग्रेस पक्षाची अवस्था ग्रीक शोकांतिकेसारखी झाली आहे. आपले पतन होत आहे हे सगळ्यांना दिसते मात्र त्यावर त्यांना करता काहीच येत नाही.

सध्याची परिस्थिती अशी आहे, की या राजकीय रणांगणावर पुढे काय करावे याचा काहीच अंदाज पक्ष नेतृत्वाला नाही. उदाहरणार्थ, राहुल गांधी याची ताजी भूमिका. कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचा वापर पाकिस्तानने केला. पाकिस्तानने जम्मू-काश्मिरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या एका पत्रात काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असताना राहुल यांच्या वक्तव्याचा हवाला दिला होता. या पत्रात मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचाही उल्लेख होता. तेव्हा राहुल यांना उपरती झाली आणि काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र तोपर्यंत व्हायचे ते नुकसान झाले होते. 

काँग्रेसची आणखी एक समस्या म्हणजे घाबरटपणा आणि आत्मसंतुष्टता ही पक्षाची सध्या वैशिष्ट्ये बनली आहेत. ज्यांना फक्त स्वत:च्या कारकीर्दीची काळजी आहे, पक्षाचे नुकसान झाले तरी ज्यांना काहीही वाटत नाही अशा नेत्यांची पक्षात गर्दी झाली आहे. त्यामुळे आत्मघातकी पावले उचलताना काँग्रेसच्या नेत्यांना काहीही वाटत नाही. आणखी म्हणजे पक्षाच्या पराभवाची कोणतीही जबाबदारी घेण्याची हिम्मत एकही नेता दाखवत नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अभूतपूर्व नुकसान झाले. मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगेच राजीनामा दिला नाही. अखेर केंद्रात राहुल गांधी यांनी स्वतः राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कसाबसा आपला राजीनामा दिला. आज हा पक्ष निर्नायकी बनला आहे.

राहुल स्वतः काँग्रेसचे नेतृत्व करायला तयार नाहीत आणि दुसऱ्या कोणाला स्वीकारायला अन्य कोणी तयार नाही. त्यामुळे मजबुरी म्हणून सोनिया गांधी यांची पक्षाध्यक्षपदी नेमणूक करावी लागली. आज काँग्रेस असा पक्ष बनला आहे ज्याच्याकडे स्वत:चा भूतकाळ आणि मोठा इतिहास आहे, मात्र आपले उद्दीष्ट काय आणि आपले भविष्य काय याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. लोकशाही, राज्यघटना आणि मूलभूत मूल्ये अशा मोठमोठ्या शब्दांचा वापर करण्यावर काँग्रेसचा भर असतो, परंतु त्यांचा वापर करण्याची वेळ आली की मात्र हेच नेते तोंड लपवू पाहतात.

याचा स्वाभाविक परिणाम मतदारांच्या मनावरही होतो. म्हणूनच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी तर काँग्रेस पक्षाच्या कारभारावर आपली  नाराजी खुलेपणाने व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांनी गुरुवारी भेट घेतली. काँग्रेस आता पूर्वी सारखी राहिली नसून दिशाहीन अवस्थेत आहे, असे सांगून हुड्डा यांनी खळबळ उडवली होती.म्हणूनच गळक्या पाईपमधून पाणी बाहेर पडावे तसे काँग्रेस नेते भाजप किंवा अन्य पक्षात उड्या मारत आहेत. जुने-जाणते म्हणविणारे नेते माघार घेत आहेत आणि शहाणे म्हणवणारे नेते मोदींची स्तुती करत आहेत.

Leave a Comment