अमेरिका-चीनच्या भांडणात फायदा भारताचा


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले काही महिने चीनशी व्यापारयुद्ध पुकारले आहे. त्याला चीननेही तोडीस तोड उत्तर दिले आहे. या दोघांच्या साठमारीत जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र याच व्यापारयुद्धाचा फायदा करून घेण्याचे भारताने ठरविले असून अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अॅपल, फॉक्सकॉन आणि विस्ट्रोन कॉर्प यांसारख्या कंपन्यांना भारतात आणण्यासाठी भारत आमिष तयार करत आहे, असे रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या व्यापारयुद्धाचा भाग म्हणून अमेरिकी कंपन्यांना चीनमधून आपले व्यवसाय हलविण्यास उत्तेजन दिले आहे. आता या कंपन्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भारत करत आहे. यासाठी लक्षित कंपन्यांच्या यादीसह अनेक भारतीय अधिकाऱ्यांची 14ऑगस्टला बैठक झाली.

या कंपन्यांमध्ये तैवानमध्ये  मुख्यालय असलेल्या पेगाट्रॉन कॉर्प या कंपनीचाही  समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमधील वादामुळे अब्जावधी डॉलर्सच्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे या वस्तूंची जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या  अतिरिक्त शुल्कातून वाढ काढण्यासाठी गुंतवणूकीच्या इतर संधी या कंपन्या शोधत आहेत. खरे तर या व्यापारयुद्धाचा फायदा करून घेण्यात भारताला उशीर झाला असल्याचे मानले जाते.

तरीही उशीरा का होईना, सरकारने विविध मंत्रालयांना आपली धोरणे व प्रोत्साहनात्मक योजनांची माहिती ‘इन्व्हेस्ट इंडिया’ या संस्थेकडे सादर करण्यास सांगितले आहे. ही संस्था परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे काम करते. या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, ऑटो कंपन्या व टेलिकॉमसह नऊ क्षेत्रांना लक्ष्य केले जाईल.या कंपन्यांना त्यांच्या कामकाजासाठी सर्वोत्तम गुंतवणूक क्षेत्र सुचविण्याच्या दृष्टीने सरकारी अधिकारी 26 ऑगस्ट ते 5सप्टेंबर दरम्यान त्यांच्या भेटीगाठी घेतील. राज्य सरकारेही या उपक्रमात सहभागी होतील, असे सरकारी कागदपत्रांत म्हटले आहे. त्यानंतर संभाव्य गुंतवणूकदारांना सादर करण्यासाठी बाजारपेठेतील घटक आणि भारताकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचे संपूर्ण पॅकेज तयार केले जाईल. 

अर्थात, सरकार या कंपन्यांना  नवीन प्रोत्साहन देईल की सध्या अस्तित्त्वात असलेल्या सवलतींचीच माहिती देण्यात येईल, हे अद्याप स्पष्ट नाही.  चीन हे सध्या  बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दृष्टीने उत्पादनाचे केंद्र बनले आहे. मात्र व्यापारयुद्धाची झळ बसत असल्यामुळे या कंपन्यांनी चीनच्या बाहेर पुरवठा साखळी उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी व्हिएतनामसारख्या देशांमध्ये असलेल्या वेगवान मंजुरी व स्थिर धोरणांमुळे त्या देशाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते, असे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अल्फाबेट इन्कॉर्पोरेट कंपनीने आपल्या गुगल पिक्सेल स्मार्टफोनचे उत्पादन यावर्षीपासून व्हिएतनाममध्ये करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती निक्केई बिझिनेस डेलीने बुधवारी दिली.

“भारत हा प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ असलेला एक अक्राळविक्राळ देश आहे. मात्र त्याला हालचाल करावी लागेल,” असे वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे अमेरिकन-भारत तज्ज्ञ रिचर्ड रोसो यांचे म्हणणे आहे. अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे जागतिक वाहन उद्योगाची पुरवठा साखळीही विस्कळीत झाली असून त्यामुळे मोठ्या वाहन उत्पादकांवर परिणाम झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अधिका्यांनी या आठवड्यात फोक्सवॅगन, ह्युंदाई मोटर  आणि होंडा मोटर कंपनीसह विविध कंपन्यांच्या स्थानिक प्रतिनिधींची स्वतंत्रपणे भेट घेतली.

या कंपन्या आपले काही कामकाज भारतात हलवू इच्छित आहेत का, याची चाचपणी त्यांनी केली. “सरकार याकडे  एक मोठी संधी म्हणून पाहत आहे,” असे उद्योगातील एका अधिकाऱ्याने सांगितले.जगप्रसिद्ध अॅपल कंपनीलाही या युद्धामुळे मोठा धक्का बसला असून अॅपलने चीनमध्ये उत्पादन केलेल्या स्मार्टवॉचसारख्या मोठ्या उत्पादनांवर अमेरिका सरकारने 1 सप्टेंबरपासून15% दंड आकारण्यास सुरूवात केली आहे.

तसेच  आयफोनवर 15 डिसेंबरपासून शुल्क आकारण्यात येणार आहे. भारत ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ आहे आणि यात वाढीसाठी आणखी मोठा वाव आहे. फॉक्सकॉन ही कंपनी भारतात अॅपलच्या फोनची जुळणी करते आणि तिने भारतात विस्तार केला आहे, मात्र चीनसारख्या देशांमध्ये अधिक कुशल कामगार आणि अधिक सुसंघटित सोईसुविधा आहेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment