लालबागच्या राजाची पहिली झलक


आपल्या देशासह जगभरात ख्याती प्राप्त असलेल्या अनेक भाविकांचे श्रद्धास्थान अर्थात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसांदरम्यान मोठी गर्दी असते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास गर्दी करतात. लालबागचा राजा यंदा 86 वे वर्ष साजरे करत असून आज या मंडळाकडून लालबागचा राजा 2019 ची पहिली झलक दाखवण्यात आली असून गणरायाचे दर्शन सामान्य नागरिकांना 2 सप्टेंबर 2019 पासून पुढील दहा दिवस मंडपामध्ये घेता येणार आहे. नितीन देसाई यांनी यंदा चांद्रयान 2 च्या थीमवर लालबागच्या राजाची आकर्षक सजावट केली आहे.


लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा 2 सप्टेंबरच्या पहाटे होईल. त्यानंतर भक्तांसाठी लालबागच्या राजाचे दर्शन खुले होणार आहे. यंदा 20 जुलै दिवशी लालबागच्या राजाचे पाद्यपूजन झाले. त्यानंतर लालबागच्या राजाच्या मूर्तीला साकारण्यात आली. मुंबईमध्ये घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या धामधूमीमध्ये साजरा केला जातो. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ हे त्याच्यापैकी एक आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तितक्याच धामधूमीमध्ये हा सण यंदाही साजरा केला जाणार आहे.


पश्चिम महाराष्ट्राला मागील काही दिवसांपूर्वी पूराने झोडपून काढल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या सेलिब्रेशनला कात्री लावत पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. लालबागच्या सार्वजनिक गणपती मंडळाकडूनही गाव दत्तक घेऊन त्यांना सावरण्यासाठी मदत केली जाणार आहे.

Leave a Comment