शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने भारतीय विद्यार्थ्यांना या देशांमध्ये उत्तम संधी


दर वर्षी हजारी भारतीय तरुण-तरुणी उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी जात असतात. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या तारखेला सुमारे ८,००,००० भारतीय विद्यार्थी सध्या इतर देशांमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने रहात आहेत. जगातील अनेक देशांमध्ये उच्चशिक्षणासाठी अनेक उत्तमोत्तम नावाजलेली विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमधून शिक्षण घेतानाच भविष्यकाळामध्ये नोकरीच्या अनेक उत्तम संधीही विद्यार्थ्यांना मिळत असतातच, पण त्याचसोबत शिक्षणाच्या निमित्ताने तिथे राहताना तेथील संस्कृती, चाली-रीती, परंपरा यांचीही तोंडोओळख होत असते. शिक्षणासाठी किंवा त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने परदेशी जायचे झाल्यास, भारतीय विद्यार्थ्यांसाठी काही देशांमध्ये अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत. हे देश कोणते, ते जाणून घेऊ या.

कॅनडा या देशामध्ये इतर अनेक देशांतले लोक येऊन स्थायिक झाले असल्याने या देशामध्ये परंपरा, संस्कृती याचे वैविध्य पहावयास मिळते. या देशामध्ये उच्च शिक्षणासाठी आणि त्यापुढे नोकरीसाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध असल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये हा देश अतिशय लोकप्रिय आहे. कॅनडामध्ये शिक्षण घेत असतानाच नोकरी करण्यासही मुभा असल्यामुळे तिथे राहण्याच्या खर्चाचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटलेला असतो. त्यामुळेच बहुतेक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी कॅनडाला प्राधान्य देताना आढळतात. कॅनडाच्या पाठोपाठ जर्मनी हा देश भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. जगातील काही सर्वोत्तम विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था या देशामध्ये आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण आणि अर्थव्यवस्था या तीनही बाबतीत हा देश अतिशय झपाट्याने प्रगती करीत आहे. तसेच येथील बहुतेक सर्वच उत्तम विद्यापीठे सरकारी निधीतून चालविली जात असल्याने त्यांची शुल्के परवडण्याजोगी असतात. तसेच या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असताना नोकरी करण्याची परवानगीही विद्यार्थ्यांना असते.

चीन आणि युनायटेड किंग्डम या दोन्ही देशांमध्ये ही भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. इंग्लंडमध्ये जगातील काही प्राचीन आणि सर्वमान्य विद्यापीठे आहेत. त्याचप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीमध्येही अनके उत्तमोत्तम विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था आहेत. यातील अनेक विद्यापीठांना जागतिक मान्यता असून यातील शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाच्या सोबत प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभवही मिळावा अश्या पद्धतीने आखण्यात आले आहेत.

Leave a Comment