अर्थव्यवस्थेसंदर्भात व्यक्त केलेली राज ठाकरेंची शक्यता खरी ठरली


मुंबई – सध्या आर्थिक मंदीची देशभरात चर्चा सुरु आहे. मर्यादित काळापुरते आपले उत्पादनही काही कंपन्यांनी थांबवले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने हिच आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १ लाख ७६ हजार कोटी रुपये घेतल्याची बातमी समोर आली. काँग्रेससहित इतर विरोधीपक्षांनी यावरुन टिकेची झोड उठवली आहे. असे असतानाच आता राज ठाकरेंचा ९ ऑगस्टच्या भाषणाचा एक व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट केला आहे. मोदी सरकार, रिझर्व्ह बँक आणि अर्थव्यवस्थेसंदर्भात राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली असल्याचे मनसेचे म्हटले आहे.

९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. मनसेने भाषणाचा तोच व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओला नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार’… हे राजसाहेबांचे ९ ऑगस्ट २०१९ चे भाकीत खरे ठरले!, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये पैसेरहित अर्थक्रांतीला सुरुवात झाल्याची टीका राज यांनी केली आहे.


नोटबंदी आणि जीएसटीनंतर देशाच्या सर्वोच्च राखीव निधीलाच गळती अशा वाक्याने मनसेने ट्विट केलेल्या व्हिडिओची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर लोकसत्ता ऑनलाइन आणि बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्ताचा या व्हिडिओत हवाला देण्यात आला आहे. या व्हिडिओत राज यांच्या ९ ऑगस्टच्या भाषणातील क्लिप पुढे वापरण्यात आली आहे. राज यांनी या क्लिपमध्ये सरकारवर टीका केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेऊन आज देश चालवायला लागत आहे. आरबीआय म्हणजे रिझव्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजेच अशी बँक ज्यांच्याकडे राखीव निधी असतो. एखाद्या बँकेत तुम्ही पैसे ठेवता आणि ती बँक बुडाली तर त्याची हमी रिझर्व्ह बँक असते. बँका बुडल्या तर त्याचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून आरबीआय ही हमी देते. याच रिझर्व्ह बँकेमधून उद्या जर सरकारने पैसे काढले आणि देशातील बँका डबघाईला आल्या तर कोण पैसे देणार त्या बँकांना? लोकांना त्यांचे पैसे कुठून मिळणार?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता.

Leave a Comment