जगातील सर्वात विशालकाय पिरामिड्सपैकी एक ‘ला दान्ता’


उत्तरी ग्वाटेमालाच्या घनदाट अरण्यातून एका विशालकाय वास्तूचे शिखर दृष्टीस पडते. एखाद्या विमानातून प्रवास करताना हे शिखर पाहिले, तर त्या ठिकाणी कदाचित एखादा ज्वालामुखी असावा आणि हे त्याचे शिखर घनदाट अरण्यातील उंच उंच झाडांच्या मधून डोकवत असावे असा भास पाहणाऱ्याला होतो. मात्र हा एखादा ज्वालामुखी नसून, ही वास्तू म्हणजे जगातील सर्वाधिक विशालकाय पिरामिड्स पैकी एक असून, मायन संस्कृतीचे हे प्रतीक आहे. त्या काळी मायन संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ‘एल मिराडोर’ या शहराचा भाग म्हणून हे पिरामिड ओळखले जात असे. या पिरामिडला ‘ला दान्ता’ असे नाव देण्यात आले असून, हा पिरामिड ज्या शहराचा भाग असे, ते एल मिराडोर हे शहर ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकामध्ये अस्तित्वात होते.

त्या नंतरच्या काही दशकांमध्ये या शहराचा विकास थांबला, लोकसंख्या कमी होऊ लागली, आणि शिल्लक राहिलेले लोक इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले. अखेरीस नवव्या शतकामध्ये हे शहर पूर्णतया उजाड झाले, ओस पडले. शहरातली मानवी वस्ती नाहीशी झाल्यानंतर या शहराचा ताबा अर्थातच निसर्गाने घेतला, आणि काही वर्षांच्या काळातच एके काळी अतिशय संपन्न असलेल्या शहराचे रूपांतर निबिड अरण्यात झाले. त्यानंतर किती तरी शतकांचा काळ उलटून गेल्यानंतर, एकोणिसाव्या शतकामध्ये मायन संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुरातत्ववेत्त्यांनी येथे उत्खनन सुरु केले.

पुरातत्ववेत्त्यांनी उत्खनन करण्यास सुरुवात केल्यानंतर काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक वास्तू पुन्हा दृष्टीस पडू लागल्या, पण या वास्तूंमध्ये सर्वात लक्षणीय ठरले ते ‘ला दान्ता’ पिरामिड. ‘ला दान्ता’ची उंची तब्बल २३६ फुट असून, सुमारे ९९ मिलियन क्युबिक फुटांचा या पिरामिडचा ‘व्हॉल्यूम’ असल्याने जगातील सर्वाधिक उंच तसेच सर्वात प्राचीन पिरामिड्समधील एक असा हा पिरामिड आहे. ही विशालकाय वास्तू निर्माण करण्यासाठी पंधरा मिलियन दिवस लागले असावेत असा पुरातत्ववेत्त्यांचा अंदाज आहे. या पिरामिडच्या पूर्वेला पिरामिडवर चढून जाण्यासाठी पायऱ्या ही बनविल्या गेल्या आहेत. पिरामिडच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्यानंतर तिथून अथांग समुद्र आणि आसपासचे अरण्य असे विहंगम दृश्य नजरेला पडते.

हा पिरामिड पाहण्यास येणारे पर्यटक ‘फ्लोरीस’ शहरापासून हेलिकॉप्टरमधून प्रवास करून येथवर पोहोचू शकतात. तसेच अनेक हौशी मंडळी कार्मेलिटा शहरामधून आपल्या सोबत गाईड घेऊन येथवर हायकिंग करीत येणे ही पसंत करतात. हायकिंग करीत इथवर पोहोचण्यास काही दिवसांचा अवधी लागत असून निबिड अरण्यातून वाट काढत इथवरचा प्रवास पूर्ण करता येतो.

Leave a Comment