प्रज्ञा ठाकूर – भाजपची ‘असून अडचण, नसून खोळंबा’


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नको त्या चर्चांना वाव देणाऱ्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादाला फोडणी दिली आहे. यावेळी विरोधकांच्या “मारक शक्ती”चे वक्तव्य करून त्यांनी विरोधी पक्षांना कोलित तर दिलेच, शिवाय लोकांना चेष्टा करायला कारणही पुरवले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांनीही त्यांच्यापासून हातभर अंतर राखणे पसंत केले आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांना हरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रज्ञासिंह यांची निवड केली. मात्र मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोप असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी पक्षाला सातत्याने अडचणीत आणले आहे. ठाकूर यांना सक्रिय राजकारणात येऊन केवळ पाच-सहा महिने झाले आहेत. मात्र या काळात त्यांनी अन्य कोणाही नेत्यापेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या वक्तव्यांवर पक्ष नेतृत्वापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सार्वजनिकरीत्या आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र प्रज्ञा ठाकूर यांची सरबत्ती काही थांबायला तयार नाही.

सोमवारी ठाकूर यांनी असेच आणखी एक वावदूक वक्तव्य केले. भाजपच्या एकानंतर एका ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूमागे विरोधी पक्षांनी केलेला मारक शक्ती किंवा तंत्र-मंत्राचा उपयोग आहे, असे त्या म्हणाल्या. “एकदा एका महाराजांनी मला सांगितले, की आपला वाईट काळ येत आहे आणि विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात मारक शक्ती वापरून काही तरी करत आहे. त्यांनी काय सांगितले, ते मी विसरले मात्र आता आपले वरिष्ठ नेते एकामागोमाग आपल्याला सोडून जात असताना, ते साधु महाराज बरोबर तर सांगत नव्हते ना अशी शंका मला येते,” असे त्या म्हणाल्या.

विशेष म्हणजे प्रज्ञा ठाकरू यांनी हे वक्तव्य माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत केले. त्या हे बोलत असताना श्रद्धांजली सभेला आलेले भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, प्रदेश अध्यक्ष राकेश सिंह, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव असे ज्येष्ठ नेते अस्वस्थ झालेले दिसत होते. म्हणूनच विजयवर्गीय यांनी आग्रह करूनही शिवराज यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया द्यायला नकारदिला. गोपाल भार्गव तर एक पाऊल पुढे गेले. “मारक क्षमता आणि शक्ती काय असते, हे त्याच सांगू शकतील.मी तर विधिमंडळ नेता आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही,” असे ते म्हणाले.

अशा प्रकारचे हास्यास्पद वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिली वेळ नव्हती. अगदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी हाच प्रकार केला होता. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले व दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे आपल्या शापामुळे मारले गेले, असे त्या म्हणाल्या होत्या. त्याबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांनी त्या वक्तव्यावर माफीही मागितली होती.

त्यानंतर महात्मा गांधीचा मारेकरी नथूराम गोडसे याच्या बाबत त्यांनी केलेले वक्तव्यही गाजले. “नथूराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहतील. जे त्यांना दहशतवादी म्हणतात त्यांनी स्वतःकडे पाहायला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या होत्या.गोडसेबाबतच्या त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनीच नव्हे तर भाजप नेत्यांनीही आक्षेप घेतला होता. त्याही वेळी चौफेर टीका झाल्यामुळे त्यांनी माफी मागितली होती. त्याच वेळेस नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. “गांधीजी किंवा गोडसेबाबत जे काही बोलण्यात आले आहे, ते अत्यंत वाईट आहे. सर्व तऱ्हेने तिरस्कार करण्याजोगे आहे. टीका करण्यायोग्य आहे. सभ्य समाजात अशा तऱ्हेची भाषा चालत नाही. या प्रकारचे विचार चालत नाहीत. त्यामुळे असे करणाऱ्यांना शंभरदा पुढे विचार करावा लागेल. त्यांनी माफी मागितली हे वेगळी गोष्ट आहे, मात्र मी मनातून त्यांना माफ करू शकत नाही,” असे मोदी म्हणाले होते.

मोदी यांचा भाजपमध्ये एकाधिकार असून त्यांच्यापुढे कोणाचे चालत नाही, असे म्हणतात. परंतु प्रज्ञा ठाकूर यांनी हा समज खोडून काढला आहे. खुद्द मोदींनी कानउघाडणी केल्यावरही त्यांचे तोंड थांबायला तयार नाही. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने त्या ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा झाल्या नसतील तरच नवल!

Leave a Comment