वैज्ञानिकांना सापडला रूपकुंड तलावाच्या रहस्याची उकल करणारा ‘डीएनए एव्हिडन्स’


उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयाच्या कुशीत, सुमारे साडे सोळा हजार फुटांच्या उंचीवर रूपकुंड तलाव आहे. केवळ एकशे तीस फुट रुंदीचा हा तलाव थंडीमध्ये गोठलेल्या स्थितीमध्ये असल्याने इतर सर्वसामान्य तलावांच्या प्रमाणेच भासतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा या तलावातील पाण्याचा बर्फ वितळू लागतो, तेव्हा या तलावाशी निगडीत भयाण सत्य पुन्हा एकदा सर्वांच्या समोर उभे राहते. बर्फ वितळला की या तलावामध्ये असलेले असंख्य मानवी सांगाडे दृष्टीस पडू लागतात. त्यामुळे या तलावाला ‘स्केलेटन लेक’ या नावानेही ओळखले जाते. हे सांगाडे कोणाचे, ते इथवर कसे आले, आणि इतक्या मोठ्या संख्येने हे सांगाडे इथे का, या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरु होता. सुरुवातीला जेव्हा इतके सारे सांगाडे एकत्र सापडले, तेव्हा कधी काळी येथे मानवी वसाहत असून, एखाद्या नैसर्गिक आपदेमध्ये या सर्वांचे प्राण गेले असावेत, असा एक कयास लावण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी एका अँथ्रोपोलॉजिकल संस्थेच्या वतीने जेव्हा यातील पाच सांगाड्यांचे विशेल्षण करण्यात आले, तेव्हा हे सांगाडे सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचे असावेत असे निदान करण्यात आले.

पण अलीकडेच भारतीय, जर्मन आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी एकत्रितपणे या सांगाड्यांचे जेनेटिक विश्लेषण केले असता, हे सर्व सांगाडे, एकत्रच, एकाच वेळी मृत्यमुखी पडलेल्या माणसांचे असावेत ही थियरी चुकीची ठरली आहे. या वैज्ञानिकांनी एकूण ३८ सांगाड्यांचे विशेल्षण केले असता, हे सर्व सांगाडे निरनिराळ्या वेळी मरण पावलेल्या माणसांचे असल्याचे निश्चित निदान करण्यात आले आहे. या संबंधीचे विस्तृत रिपोर्ट्स ‘द नेचर कम्युनिकेशन्स’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

रूपकुंड तलाव आणि त्यातील मानवी सांगाड्यांच्या विषयीची माहिती वैज्ञानिक आणि अँथ्रोपोलॉजिस्टस् ना गेल्या अनेक वर्षांपासून होती. मात्र इतके सगळे मानवी सांगाडे या तलावात कसे आले या रहस्याची उकल मात्र होत नव्हती. तसेच गेल्या अनेक वर्षांमध्ये घडून गेलेली बर्फवृष्टी, रॉक स्लाईड तर कधी त्या रहस्याची उकल करण्याच्या दृष्टीने तिथे गेलेल्या पुरातत्ववेत्त्यांनी आणि इतरही हौशी मंडळींनी देखील हे सांगाडे अनेकदा जागचे हलविले होते. त्यामुळेच सांगाड्यांच्या विषयीची माहिती मिळविणे अवघड होत होते. मात्र अलीकडे केल्या गेलेल्या जेनेटिक विश्लेषणामध्ये वैज्ञानिकांना एकूण अडतीस सांगाड्यांपैकी तेवीस सांगाडे पुरुषांचे, तर पंधरा सांगाडे स्त्रियांचे असल्याचे निदान करण्यात यश आले आहे. हे सांगाडे ज्या व्यक्तींचे आहेत, त्यांचे मृत्यू सातव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यानच्या काळामध्ये झाले असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले आहे. तसेच या व्यक्तींचे मृत्यू कोणत्याही प्रकारच्या आजाराने किंवा अपघाताने झालेले नसून, कदाचित इतक्या उंचीवरील अतिशय थंड हवामानामुळे यांचे मृत्यू झाले असल्याचे कयास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment