पॅकेज्ड पदार्थ खाताय? आधी हे वाचा


चिप्स, कुरकुरे, बिस्किटे किंवा चिवडा असे अनेक पदार्थ आज आपण विकत आणून खातो. हे सर्व पदार्थ आकर्षक वेष्टनांमध्ये आणि रंगीबेरंगी पाकिटांमध्ये उपलब्ध असतात. मात्र या वेष्टनांच्या आकर्षणाने आपण आजारांना आमंत्रण तर देत नाही ना? एका ताज्या सर्वेक्षणाने हाच मुद्दा समोर आणला आहे.

भारतात मिळणारे पाकिटबंद किंवा डबाबंद अन्नपदार्थ हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत. एका जागतिक सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीय डबाबंद अन्नपदार्थांमध्ये संतृप्त चरबी, साखर आणि ऊर्जा घनत्व नियत प्रमाणापेक्षा जास्त आहे, असे या सर्वेक्षणात आढळले आहे. यामुळे कोवळ लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेह वाढू शकतो तर हृदयाशी संबंधित आजारांचेही ते प्रमुख कारण ठरू शकते.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ या संस्थेने 12 देशांतील 4 लाखांपेक्षा जास्त अन्नपदार्थ व पेय पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे. ‘ओबीसिटी रिव्ह्यूज जर्नल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. खाद्य व पेय पदार्थांच्या टिकाऊपणासाठी आवश्यक असलेल्या मीठ, साखर, संतृप्त चरबी, प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, ऊर्जा इत्यादी घटकांचे प्रमाण यात मोजण्यात आले. तसेच हेल्थ स्टार रेटिंग सिस्टिमच्या आधारे विविध देशांना क्रमांक देण्यात आले आहेत.

यात उत्तम पॅकेज्ड खाद्यपदार्थ आणि पेयांच्या संदर्भात ब्रिटनचा क्रमांक सर्वात वर लागला असून त्याला 2.83 स्टार रेटिंग मिळाली आहे. त्यानंतर अमेरिका (2.82) व ऑस्ट्रेलिया (2.81) यांचा क्रमांक आहे. भारताला 2.27 स्टार रेटिंग मिळाली असून चीनला 2.43 व चिली या देशाला 2.44 स्टार रेटिंग मिळाली आहे.

जागतिक पातळीवर आपण प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेल्या अन्नावर खूपच अवलंबून राहू लागलो आहोत. आपले सुपरमार्केट हे चरबी, साखर आणि अत्यधिक प्रमाणातील मीठ असलेल्या उत्पादनांनी भरलेले आहेत आणि ते आपल्याला आजारी करतात. दुर्दैवाने सर्वात गरीब देश याबाबत बोलूसुद्धा शकत नाही आहेत, असे या सर्वेक्षणाच्या संचालिका एलिझाबेथ डनफर्ड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

खरे तर शहरीकरण आणि कामकाजाच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. भारतात हा व्यवसाय बराच उशीरा सुरू झाला. लोणची आणि चटण्या बनविणारे काही कारखाने सुरुवातीला इंग्लंड इत्यादी देशांत आपला माल निर्यात करीत असत. महाराष्ट्रात हवाबंद डब्यातून हापूसचे आंबे निर्यात करण्याच्या उद्देशाने काही कारखाने 1930 नंतर सुरू झाले होते. मात्र तो आर्थिक मंदीचा काळ असल्याने ते कारखाने फारसे यशस्वी ठरले नाहीत. पुढे जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा टिकविलेल्या खाद्यपदार्थांची सैनिकांसाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर जरूरी भासू लागली आणि तेव्हापासून फळे व भाज्या डबाबंद करणारे बरेच कारखाने उदयास आले. याच काळात महिलांनी नोकरीसाठी बाहेर पडायला सुरूवात केली तेव्हापासून पाकिटबंद किंवा डबाबंद अन्नपदार्थांचे प्रचलन वाढले आहे. त्यातही डबाबंद पदार्थांची सवय मुलांमध्ये जरा जास्तच आहे. अशा पदार्थांमुळे स्वयंपाक करण्याच्या कटकटीपासून सुटका होते आणि वेळही वाचतो. त्यामुळे खाण्यासाठी हे पदार्थ सोपे जातात. मात्र असे पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या आरोग्याच्या पैलूकडे साफ दुर्लक्ष करतात. अशा पदार्थांमुळे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता यापूर्वी संशोधकांनी वर्तवली आहे.

“हे संशोधन भारतासारख्या देशांसाठी एक सावधानीचा इशारा आहे कारण येथे पॅकेज्ड फूड उद्योग वाढत आहे आणि छोट्या शहरे व खेड्यांपर्यंत त्याचा विस्तार होत आहे. लठ्ठपणाचा सतत वाढणारा धोका आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी धोरण निर्माते आणि अन्न उद्योग यांनी एकत्रितपणे उत्पादनांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे,” असे मत जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ, इंडियाचे कार्यकारी संचालक विवेकानंद झा यांनी व्यक्त केले.

अर्थात, या पदार्थांच्या धोक्यावर उपाय नाहीत असे नाही. भारतात सरकारने या संदर्भात काही नियम केले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अन्न सुरक्षा व प्रमाण (लेव्हलिंग अँड डिस्प्ले)नियमावली 2019 या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत अन्नपदार्थ कंपन्यांना डबाबंद उत्पादनांवर त्या पदार्थात चरबी, साखर व मिठाचे प्रमाण जास्त असल्यास लाल रंगात त्याचा निर्देश करावा लागेल. तसेच डबाबंद अन्नपदार्थांमध्ये किती प्रमाणात कोणकोणते पदार्थ आहेत, हेही सांगावे लागेल. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत. आणखी नियम तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी खरे म्हणजे ग्राहकांमध्येच जास्त जागरूकता येण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment