मोदींनी ठणकावले, ट्रम्प वरमले, पाकिस्तान नमले!


काश्मिर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची अनाहूत तयारी दाखवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले ते बरे झाले. मोदींनी केलेल्या स्पष्टोक्तीनंतर ट्रम्प यांचा आवेशही उतरला आणि ते एक पायरी खाली उतरल्याचे दिसून आले. भारताच्या कूटनीतीचा हा एक मोठा विजय मानला पाहिजे.

काश्मिर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मोदी यांनी जोर देऊन सांगितले. फ्रान्समध्ये होत असलेल्या जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मोदी यांनी हे वक्तव्य केले. भारत-पाकिस्तानमधील काश्मीरसह सर्व विषय हे दि्वपक्षीय मुद्दे आहेत. आम्हाला तिसऱ्या देशाला त्रास द्यायचा नाही असे मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे ते हे सांगत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या बाजूलाच बसले होते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ट्रम्प आणि मोदी यांनी या भेटीत काश्मीरसह वेगवगेळया मुद्दांवर चर्चा केली, असे सांगण्यात आले.

काश्मिरबाबत आपण भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करायला तयार आहोत, हे तुणतुणे ट्रम्प यांनी इतके दिवस वाजवले होते. मोदी यांनी ठणकावल्यानंतर त्यांचा सूर पालटला. दोन्ही देश आपसांतील मतभेद सोडवतील, असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.

“आम्ही काल रात्री काश्मीरविषयी बोललो. पंतप्रधानांना (मोदींना) खरोखर वाटते की त्यांचे स्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. ते पाकिस्तानशी चर्चा करतात आणि मला खात्री आहे की अत्यंत चांगले असे काही तरी ते करून दाखवतील,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

मोदींनी या प्रश्नी मध्यस्थी करण्यास आपल्याला सांगितले आहे, असा दावा ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. केंद्र सरकारने त्याचे त्वरित खंडन केले होते. तेव्हा अमेरिका सरकारने हा प्रश्न द्विपक्षीयच असल्याचे मान्य केले होते. अखेर भारत सरकारने जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 30 रद्द केले.

गंमत म्हणजे ट्रम्प हे वारंवार काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची धडपड करत असताना दुसरीकडे त्यांचे सरकार, मंत्री, अधिकारी, खासदार यांनी मात्र हा भारत-पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे वारंवार स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करताना याची पुष्टी केली होती. व्हाइट हाऊसनेदेखील काश्मीर प्रश्न भारत-पाकिस्तानने चर्चेतून सोडवावा, असे आवाहन केले होते. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर अमेरिकेतील वरिष्ठ राजनयिक, अधिकारी आणि माजी राजदूतांनीही नाराजी व्यक्त केली होती. यामुळे भारतासारखा मित्र दुखावला जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

तरीही ट्रम्प यांनी आपला हट्ट चालूच ठेवला होता. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला. “काश्मीर हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. या प्रश्नाचा धर्मासोबतही संबंध आहे. तेथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे लोक आहेत. मला वाटत नाही की, दोन्ही समुदाय गुण्यागोविंदाने एकत्र राहत असतील. दोन्ही देशांदरम्यान मोठा तणाव आहे. अनेक दशकांपासून हे सुरू असून, ही प्रचंड विस्फोटक परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मी मध्यस्थी करण्यास तयार आहे किंवा अजून दुसरा एखादा उपाय आपण शोधू शकतो,” असे का वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते.

त्यातही फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-७ देशांच्या परिषदेत मी मोदींशी बोलणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

त्यामुळे मोदी यांनी ट्रम्प यांना ही संधी न देताच आपले वक्तव्य करून टाकले. ट्रम्प यांना मागे हटण्यापासून पर्यायच नव्हता. मात्र ट्रम्प वरमले असले तरी खरा धक्का पाकिस्तानला बसला आहे. कारण कलम 370 रद्द झाल्यापासून पाकिस्तानने अकांडतांडव केले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडून पाकिस्तानची निराशा झाली होती आणि ट्रम्प हा त्यांचा शेवटचा आशेचा किरण होता.

मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीमुळे पाकिस्तानच्या अपप्रचारावर शेवटचा खिळा ठोकला गेला. आपल्या हाती काही तरी येईल असे एखादे निवेदन येण्याची त्याला अपेक्षा होती. त्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

Leave a Comment