या सर्वाधिक प्रभावशाली भारतीय महिला फोर्ब्स लिस्टमध्ये समाविष्ट.


आजकालच्या प्रगत युगातील महिला विचारांनी आणि क्षमतेने, राजनीतिपासून, व्यवसाय, फॅशन, हेल्थकेअर, आणि मिडीयामध्ये देखील अग्रणी आहेत. यातील काही महिलांनी त्या कार्यरत असलेली क्षेत्रे पुरुषप्रधान आहेत हा समज केवळ मोडूनच काढलेला नाही, तर या कार्यक्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तुंग यशही मिळविले आहे. या महिलांनी त्यांच्या व्यवसायामध्ये असामान्य यश प्राप्त केले आहेच, पण देश-विदेशी पसरलेल्या त्यांच्या कीर्तीमुळे हजारो लोकांसाठी या महिला प्रेरणास्रोत ठरत आल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या अश्याच काही अतिशय प्रभावशाली, प्रतिभावंत महिलांचा समावेश फोर्ब्स मॅगझिनच्या वतीने दरवर्षी जागतिक पातळीवर प्रसिद्ध केल्या जाणऱ्या ‘वर्ल्ड्स 100 मोस्ट पावरफुल वुमेन’ या यादीमध्ये केला जात असतो. यंदाच्या या यादीमध्ये भारतातील चार महिलांचा समावेश आहे.

केवळ बॉलीवूड जगतामधेच नाही, तर हॉलीवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये ९४व्या स्थानावर आहे. ३७ वर्षीय प्रियांका गोल्बल आयकॉन असून, ती अभिनेत्री आणि निर्मातीही आहे. त्याचबरोबर होल्बर्टन स्कूल नामक कोडींग अकॅडमी व ‘बम्बल’ नामक डेटिंग अॅपच्या द्वारे प्रियांका एक यशस्वी गुंतवणूकदारही आहे. ‘चाईल्ड राईट्स’ साठी ‘युनिसेफची गुडविल अम्बॅसॅडर’ म्हणून प्रियांका काम करीत असून, युनायटेड नेशन्स फाउंडेशनच्या ‘गर्ल अप’ उपक्रमामध्येही तिचा सक्रीय सहभाग आहे.

फोर्ब्स लिस्टमध्ये ८८व्या स्थानावर असलेल्या बासष्ट वर्षीय शोभना भरतिया हिंदुस्तान टाईम्स ग्रुपच्या एडिटोरियल डायरेक्टर आणि चेअरपर्सन आहेत. हिंदुस्तान टाईम्स हे भारतामध्ये सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रांपैकी एक असून, त्या व्यतिरिक्त चार एफएम वाहिनी, एक जॉब पोर्टल, एक मूव्ही आणि एन्टरटेनमेंट न्यूज पोर्टल, सिंगापूर येथे बिझनेस साप्ताहिक, एक डिजिटल मिडिया आउटलेट, एक एज्युकेशन पोर्टल आणि इतरही अनेक पोर्टल्स हिंदुस्तान टाईम्स ग्रुपच्या वतीने कार्यरत आहेत. या उद्योसमूहामध्ये सुमारे तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

भारतातील सर्वात मोठी बायो-फार्मास्युटिकल फर्म ‘बायोकॉन’च्या सर्वेसर्वा किरण मजुमदार-शॉ यंदाच्या फोर्ब्स लिस्ट मध्ये साठाव्या क्रमांकावर आहेत. किरण मजुमदार-शॉ यांनी १९७८ साली बायोकॉनची स्थापना केली असून, आता या कंपनीने अमेरीकेमध्येही आपला व्यवसाय नावारूपाला आणला आहे. रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर आणि आणि सायंटिफिक टॅलेंटमध्ये या कंपनीने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली असून, कर्करोगावर औषधासाठी ‘युएसएफडीए’ कडून मान्यता मिळालेली ही फार्मास्युटिकल कंपनी आहे.

फोर्ब्सच्या यादीमध्ये ५१व्या स्थानावर एचसीएल टेक्नोलॉजीज् च्या सीईओ आणि संचालिका रोशनी नादार मल्होत्रा आहेत. एचसीएल टेक्नोलॉजीज् चे संस्थापक शिव नादार यांच्या रोशनी कन्या असून, त्या शिव नादार फाउंडेशनच्या विश्वस्तही आहेत. या फाउंडेशनच्या वतीने भारतामध्ये अनेक शाळा आणि महाविद्यालये चालविली जातात.

Leave a Comment