पृथ्वी बस झाली, आता मोर्चा मंगळाकडे!


माणसांनी पृथ्वीवरील संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे येथे नैसर्गिक संकटे निर्माण झाली आहेत. त्यामुळे पृथ्वीवर जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. हे असेच चालत राहिले तर एक दिवस पृथ्वीचा नाश होईल, असा इशारा गेली काही वर्षे शास्त्रज्ञ देत आहेत. दुसरीकडे, पृथ्वीला पर्याय म्हणून दुसऱ्या ग्रहांवर वसती करण्याकडे काही धाडसी उद्योजक वळत आहेत. एलोन मस्क आणि जेफ बेझोस या दोन अब्जाधीश उद्योजकांनी या प्रयत्नांमध्ये पुढाकार घेतला आहे.

मस्क आणि बेझोस हे नव्या युगातील व्यावसायिक अंतराळ अन्वेषण कार्यक्रमांचे पुढारी बनले आहेत. हे दोघेही चंद्रावर बेस स्टेशन तयार करण्यासाठी आणि शेवटी मंगळावर मानवी वसाहत करण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत. या दोघांचेही वैशिष्ट्य म्हणजे माणसांना दूरच्या ग्रहांपर्यंत नेण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांमागे केवळ साहस, प्रसिद्धी किंवा पैशांचा हवयास नाही. तर, पृथ्वी हा ग्रह आता माणसांना सामावून घेण्यासाठी कमी पडत असून मनुष्यजातीला जगायचे असेल तर दुसऱ्या ग्रहाचा सहारा घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या अंतराळ कार्यक्रमांचे मुख्य तत्त्व आहे.

“एक मोठा खडक (लघुग्रह) पृथ्वीवर आदळेल आणि त्यावर बचावाचा कोणताही उपाय आपल्याकडे सध्या नाही,” असे गेल्या आठवड्यात मस्क म्हणाले होते. दुसऱ्या बाजूला आपण पृथ्वीवरील सर्व उर्जास्रोत संपवून टाकू आणि त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना मर्यादित स्त्रोत उपलब्ध असतील. यामुळे त्यांची वाढ आणि गतिशीलता खुंटेल, अशी चिंता बेझोस यांनी व्यक्त केली आहे.

पृथ्वीवरील स्रोतांच्या वापरावर निर्बंध घालण्याऐवजी इतर ग्रहांवरील अमर्यादित आणि आतापर्यंत न वापरलेल्या स्रोतांचा वापर करण्याकडे त्यांचा कल आहे.

अमेरिकेतील नॅशनल स्पेस सोसायटीच्या अॅड अ‍ॅस्ट्रा या नियतकालिकात एरोस्पेस अभियंता रॉबर्ट झुब्रिन यांनी याच विषयावर लेख लिहिला आहे. ते म्हणतात, की “कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या बाबतीत मंगळ ग्रह चंद्रापेक्षा किती तरी समृद्ध आहे आणि ते जीवशास्त्रीयदृष्ट्या सहज स्वरूपात म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड गॅस, नायट्रोजन गॅस, पाण्याचा बर्फ आणि पर्माफ्रॉस्ट अशा स्वरूपात उपलब्ध आहे. कार्बन, नायट्रोजन आणि हायड्रोजन हे समुद्राच्या पाण्यातील सोन्याप्रमाणेच चंद्रावर दशलक्षांमध्ये एक इतक्या कमी प्रमाणात असतात.”

‘द केस फॉर स्पेसः हाऊ दि रिव्होल्यूशन इन स्पेसफ्लाईट ओपन्स अप ए फ्यूचर ऑफ लिमिटलेस पॉसिबिलिटी’ हे पुस्तक झुब्रिन यांनी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, की इतर ग्रहांर वसाहत करण्याने आपल्याला नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करण्यास मदत तर होईलच, शिवाय विश्वाचे आपले ज्ञान वाढविण्यासही त्यामुळे मदत होईल. आपल्यासाठी पुरेसे संसाधन नाहीत हा समजही त्यामुळे खोडला जाईल.

बेझोस यांच्या मते, अवकाश उद्योजकतेत आजच्या घडीला मोठा अडथळा म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव. याच कारणामुळे अगदी मोजक्या अब्जाधीशांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे आणि तेही मुख्यत: अमेरिकेतून. एकदा पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या, की मर्यादित भांडवल असलेले उद्योजकसुद्धा या क्षेत्रात योगदान देण्यास सक्षम असतील, असा बेझोसचा विश्वास आहे.

“मला मंगळावर मरण यावे असे वाटते,” असे एलोन मस्कने अगदी जाहीहररीत्या सांगितले आहे. त्याने अंतराळ प्रवासासाठी स्पेसएक्स ही कंपनी स्थापन केली आहे आणि नवीन ‘अंतराळ प्रवास’ उद्योगाचा तो प्रणेता मानला जातो. त्याच्या काही अंतराळ प्रक्षेपणातील रॉकेटचा स्फोटही झाला होता, मात्र तरीही त्याने आपली हिंमत सोडलेली नाही. अंतराळ प्रक्षेपणात जगातील सर्वात कमी किंमतीपैकी त्याचे दर आहेत. शिवाय एकदा वापरलेले रॉकेट पुन्हा वापरण्यासाठी पृथ्वीवर परत आणण्याचे तंत्रज्ञान स्पेसएक्सने विकसित केले आहे. त्यामुळे प्रक्षेपणाचा खर्च आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय खासगी कंपन्या आणि अमेरिकी सरकारकडून त्याला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या आहेत.

मानवांना पृथ्वीशिवायच्या अन्य ग्रहांवर कसे राहायचे हे शिकलेच पाहिजे, असे मस्कने वारंवार म्हटले आहे. इतकेच नाही तर मंगळावर सहलींची एक मालिका हाती घेऊन अखेर तिथे कायमस्वरूपी वसाहत निर्माण करायची, हे कंपनीची स्थापनेपासूनचे ध्येय आहे. मस्क आणि बेझोस यांच्या सारख्यांच्या प्रयत्नांना किती यश येते, हे काळच ठरवेल. मात्र तोपर्यंत पृथ्वीवरील कमी होणाऱ्या संसाधनांवर मानवांना उपाय शोधावाच लागेल.

Leave a Comment