शास्त्रज्ञ म्हणतात – बिनधास्त वापरा स्मार्टफोन


स्मार्टफोन हा अनेक कारणांमुळे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. आपण दररोज आपल फोन तपासतो. आपण या आधुनिक युगात स्मार्टफोनशिवाय जगू शकत नाही, असे बहुतांश लोकांना वाटते. स्मार्टफोन आपली कामे सुलभ करतो आणि आपण प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा वापर करतो. अशा या आधुनिक जीवनशैलीचा भाग बनलेल्या स्मार्टफोनबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा नेहमीच होत राहतात. या चर्चा मुख्यतः नकारात्मकच असतात. स्मार्टफोनमुळे मुले लठ्ठ होतात इथपासून ते त्यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात येतात. झोपेची कमतरता ही समस्या स्मार्टफोन वापरकर्त्यांशी जास्त करून संबंधित आहे आणि त्याबद्दल अनेकांनी अलीकडे चिंता व्यक्त केली आहे.

मात्र अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोन किंवा संगणक वापरल्यामुळे प्रतिकूल परिणाम होत नाहीत. स्मार्टफोनमध्ये फायदे आणि तोटे दोन्ही आहेत आणि यातील तोट्यांच्या बाजूची आतापर्यंत चर्चा होत असे. पहिल्यांदाच त्याच्या चांगल्या बाजूवरही या निमित्ताने प्रकाश पडला आहे.

स्मार्टफोन वापरण्याच्या नकारात्मक परिणामांबद्दल सामान्यपणे आढळणाऱ्या मतांपेक्षा संशोधकांचा हा निष्कर्ष उलट आहे. किशोरवयीन मुलांनी फोनवर आणि ऑनलाइन वेळ घालवणे हेमानसिक आरोग्यासाठी वाईट नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

“स्मार्टफोन आणि सोशल मीडिया किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान करत आहेत, या सर्वसाधारण समजाच्या उलट आमचे निष्कर्ष आहेत. फोन आणि ऑनलाईनवर घालवलेला वेळ मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होण्याशी संबंधित आहे या कल्पनेसाठी आम्हाला फारसा पुरावा आढळला नाही,” असे नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक मायकेलिन जेन्सेन यांचे म्हणणे आहे.

जर्नल ऑफ क्लिनिकल सायकोलॉजिकल सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यासाठी या संशोधकांनी 10 ते 15 वर्षांदरम्यानच्या 2,000 हून अधिक किशोरवयीन मुलांचे सर्वेक्षण केले. संशोधकांनी त्यांच्या दिवसातून तीन वेळा दररोज मानसिक आरोग्याच्या लक्षणांच्या नोंदी घेतल्या रोजच्या तंत्रज्ञानाचा वापराच्या नोंदी रात्री घेतल्या. डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करणाऱ्या तरुणांमध्ये मानसिक अस्वास्थ्याचीलक्षणे दिसण्याची शक्यता जास्त आहे का, याचे त्यांनी विश्लेषण केले. परंतु डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर मानसिक आरोग्याशी संबंधित नसल्याचे त्यांना आढळले.

ज्या मुला-मुलींनी अधिक टेक्स्ट संदेश पाठवल्याचे सांगितले त्यांना कमी टेक्स्ट संदेश पाठविणाऱ्या मुला-मुलींपेक्षा कमी नैराश्य जाणवले, असे संशोधकांनी म्हटले आहे.

“किशोरांच्या मानसिक आरोग्यासाठी स्मार्टफोन आणि सोशल मीडिया चांगले किंवा वाईट आहेत की नाही, यावर प्रौढांनी वाद घालवणे थांबवण्याची आता वेळ आली आहे,” असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक कँडिस ओडर्स म्हणाले.

तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर करण्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक जणांनी गेल्या दशकात सांगितले आहे. विशेषत: तरूण लोकांसाठी ही समस्या जास्त जाणवत असल्याचे मानले जाते. मात्र स्वतः किशोरवयीन मुला-मुलींना तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्याचे संभाव्य परिणाम माहीत आहेत आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांची जाणीवही आहे.

या संशोधनानुसार,यापूर्वी अमेरिकेतीलच ड्यूक विद्यापीठाचे मेडेलीन जॉर्ज यांनीही या विषयावर एक संशोधन केले होते. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी ‘चाइल्ड डेव्हलपमेंट’ नियतकालिकात प्रसिद्ध केले होते. त्यांच्या मते, किशोरवयीन मुला-मुलींनी स्मार्टफोन किंवा गॅझेटचा अधिक वापर केल्यास त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ते कोणत्याही एक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करु शकत नाही. यासोबतच त्यांच्यामध्ये हायपर अॅक्टिव्हिटी डिस्ऑर्डरची लक्षणे दिसू लागतात. मात्र जेव्हा किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोनचा जास्त वापर केला तेव्हा त्यांच्यात नैराश्य आणि चिंता यांची लक्षणे कमी दिसून आली, असेही मेडेलीन यांना आढळले होते.

त्या संशोधनात 151 किशोरवयीन मुलांच्या स्मार्टफोन वापराचा अभ्यास करण्यात आला होता आणि दिवसातून तीनदा त्यांचा सर्व्हे करण्यात आला होता. ही पाहणी महिनाभर सुरू होती.यामध्ये 11 ते 15 वर्षे वयोगटातील मुले सहभागी झाले होते.

अर्थात संशोधकांनी स्मार्टफोनच्या बाजूने कौल दिला असला तरी अति सर्वत्र वर्जयेत् या न्यायाने कोणत्याही गोष्टीत प्रमाण बाळगणे महत्त्वाचेच असते. त्यामुळे संशोधकांचा निष्कर्ष हा बेसुमार वापराचा परवाना ठरत नाही, एवढे लक्षात घ्यायला हवे.

Leave a Comment