काँग्रेस आघाडीला आता धक्का रिपाइंचा!

आधीच नव्या सहकारी पक्षांना सोबत घ्यायचे का नाही यावरून संभ्रमात असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आणखी एका पक्षाने धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला दोन जागा न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने दिला आहे. विदर्भात विशेषतः या गटाचा प्रभाव असल्यामुळे आघाडीला त्यांच्या नाराजीची दखल घ्यावीच लागणार आहे.

रिपाइं गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी शनिवारी नागपूर येथे पत्रकार परिषद बोलावून आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. काँग्रेसच्या निवडून न येणाऱ्या जागाही तो पक्ष आपल्या मित्र पक्षांसाठी सोडायला तयार नाही. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा काँग्रेसने रिपाइंसाठी न सोडल्यास आम्ही आघाडीतून बाहेर पडू, असे डॉ. गवई म्हणाले.

गवई गटाने गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला हरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली होती. यामुळेच अमरावती मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला, असे या गटाचे म्हणणे आहे. त्यावेळी गवई गटाने लोकसभेची एकही जागा मागितली नव्हती, मात्र विधानसभेच्या वेळेस जास्त जागा सोडण्याची हमी घेतली होती. आता ती हमी पूर्ण करायची वेळ आहे, असे रिपाइंला वाटते.

रिपाइंने विधानसभेसाठी काँग्रेसकडे 10 जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदार संघातून काँग्रेस गेल्या अनेक वर्षात निवडून आलेली नाही. मात्र रिपाइंने येथे निवडणूक लढवल्यास तो पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहतो, असा इतिहास आहे. त्यामुळे या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्यात, अशी मागणी गवई यांनी केली आहे. मात्र काँग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही.

काँग्रेस व राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचाही विचार गवई यांनी बोलून दाखवला. या दोन जागा सोडत असतील तरच काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा होईल, अन्यथा आम्ही आघाडीतून बाहेर पडू आणि अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघासह महाराष्ट्रातील 50 जागा लढवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वास्तविक डॉ. गवई यांनी यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला होता. “ॲड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी स्थापन केलेल्या ‘वंचित आघाडी’मध्ये आपल्यालाही सहभागी करून घेण्याची विनंती आपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली होती.मात्र, ती विनंती फेटाळून त्यांनी आपल्याला वंचित केले,” अशी कैफियत त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडली होती.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणींत यामुळे चांगलीच भर पडणार आहे. कारण एकीकडे त्या पक्षांतील नेते व कार्यकर्ते झुंडीने भाजपकडे जात आहेत. दोन्ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाचा झेंडा सोडून भाजप-शिवसेनेची सत्ता जवळ केली आहे. दुसरीकडे सहकारी पक्ष आधीच कमी असलेल्या जागांमध्ये वाटा मागत आहेत. राष्ट्रवादीत आता पवार कुटुंबीय वगळता नावाजलेला चेहरा अभावानेच आढळत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस जवळजवळ निर्नायकी झाली आहे. केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसकडे नेतृत्वाचा दुष्काळ जाणवतो आहे. कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भवितव्य दिसत नाही.

इकडे सरकारने तर प्रचाराचा धडाकाही उडवून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा राज्यात फिरत आहे. तिसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप यांच्या युतीची चर्चा प्राथमिक पातळीवर असतानाच ‘वंचित बहुजन आघाडी’ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याचाच अर्थ या आघाडीला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी युती करण्यात स्वारस्य नाही. लोकसभा निवडणुकीत या आघाडीने मते खाल्ल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला होता, असे राजकीय निरीक्षकांचे मत होते.
या सर्व पार्श्वभूमीवर नवे मित्र मिळणे राहिले एकीकडे, आहे ते मित्रही जर काँग्रेस- राष्ट्रवादीला सोडून जात असतील, तर त्याचा अर्थ या पक्षांसाठी दुष्काळात तेरावा असाच होईल.

Leave a Comment