वजनदार क्रिकेटर रहकीम विषयी काही


सध्या वेस्ट इंडीजच्या क्रिकेट टीम मध्ये सामील झालेला रहकिम कॉर्नवॉल हा बाहुबली खेळाडू सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. २६ वर्षीय रहकिम कॉर्नवॉल साडेसहा फुट उंच आणि १४० किलो वजनाचा आहे आणि अनेक वर्षे वेस्ट इंडीजच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी बजावल्यावर आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम मध्ये जागा मिळाली आहे.

वास्तविक रहकिम कॉर्नवॉल उत्तम गोलंदाज आणि फलंदाज आहे. मात्र त्याच्या अचाट वजनामुळे त्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळत नव्हते आणि त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय टीम मध्ये संधी मिळत नव्हती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५३ सामन्यात २१०१ रन्स आणि २५६ विकेट घेऊनही तो टीम बाहेर होता. मात्र आता त्याचे हे नष्टचर्य संपुष्टात आले आहे. त्याच्या बाहुबली आकारमानामुळे त्याला माउंटन मॅन असे टोपण नाव मिळाले आहे.

गतवर्षी अँटीगा ऑब्झर्व्हरला दिलेल्या मुलाखतीत रहकिम कॉर्नवॉल म्हणाला होता, लोक माझ्या आकारमानावरून चर्चा करतात पण माझ्या उंचीचा फायदा चांगली बोलिंग आणि बॉल स्पिन करताना मिळतो. क्रिकेटसाठी मी वजन कमी करायला हवे हे कळतेय, पण खरे सांगायचे तर मी जसा आहे त्यात खुश आहे. माझ्या कामगिरीवरून माझी परीक्षा करा, शरीरावरून नको.

Leave a Comment