26/11 हल्ला; वीस गर्भवती महिलांचे प्राण वाचविणारी रणरागिणी


मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये सव्वीस नोव्हेंबर २००८ रोजी नर्स अंजली कुलथे यांची ड्युटी ‘अँटीनेटल वॉर्ड’मध्ये होती. प्रसूती होण्यापूर्वी काही तास आधी गर्भवती महिलांना जिथे दाखल केले जाते, तो हा वॉर्ड होता. त्या वेळी त्या कक्षामध्ये वीस गर्भवती महिला दाखल होत्या. या सर्व वीस महिलांची प्रसूती पुढील काही तासांमध्ये होणे अपेक्षित होते. या सर्व महिलांकडे योग्य लक्ष पुरविण्याची जबाबदारी नर्स अंजली यांची होती. त्याचवेळी पहिल्या मजल्यावर असलेल्या या वॉर्डमध्ये असलेल्या अंजली कुलथे यांनी हॉस्पिटलमध्ये काहीतरी गदारोळ झाल्यासारखे वाटले. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्या खिडकीतून डोकावल्या असता, हॉस्पिटलच्या दोन चौकीदारांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. त्याचबरोबर हातामध्ये बंदुका घेतलेले दोन तरुणही त्यांना हॉस्पिटलच्या वरच्या मजल्याकडे येताना दिसले. हे तरुण दुसरे तिसरे कोणीही नसून, अजमल आमिर कसाब आणि अबू इस्माईल हे दोन अतिरेकी होते.

क्षणार्धात सर्व प्रकार अंजलीच्या लक्षात आला. या तरुणांना अँटीनेटल विभागामध्ये येण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने अंजलीने या विभागाकडे येणारे दरवाजे बंद करून घेतले. एव्हाना हे दोघे अतिरेकी झपाट्याने वरच्या मजल्याकडे धावत येत होते. त्यातील एका अतिरेक्याने अँटीनेटल विभागाच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यातील एक गोळी विभागातील एका आयाच्या हाताला चाटून गेल्याने ती जखमी झाली. आता मात्र वेळ घालवून उपयोग नव्हता. जर सर्व गर्भवती महिला आणि त्यांना होणाऱ्या अपत्यांचे प्राण वाचवायचे असतील तर काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते हे अंजलीने जाणले. सर्व गर्भवती महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या परिवारजनांना अंजलीने विभागाजवळच्या पँट्रीमध्ये हलविले.

तूर्तास तरी ही सर्व मंडळी सुरक्षित असल्याने अंजली विभागामध्ये परत आली. तेथे येऊन पोहोचलेल्या डॉक्टरांना घडल्या प्रकारची माहिती देत त्वरित पोलिसांना या बाबत सूचना देण्यास तिने सांगितले. त्यानंतर अंजली जखमी आयाला घेऊन कॅज्युअल्टी विभागात गेली आणि इथे त्या नर्सच्या जखमी हाताचे ड्रेसिंग केले. त्यावेळी रात्रीच्या दहाचा सुमार होता.

एव्हाना कामा हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेल्या पोलिसांना हॉस्पिटलच्या आत सहजासहजी प्रवेश मिळू नये यासाठी पोलिसांच्या दिशेने दोघा अतिरेक्यांनी हँड ग्रेनेड्स फेकण्यास सुरुवात केली. होणाऱ्या प्रत्येक धमाक्याबरोबर हॉस्पिटलची इमारतही हादरत होती. आणि त्याचवेळी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या आत, हॉस्पिटलचे कर्मचारी रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये हलवीत होते. हॉस्पिटलच्या आतमध्ये असलेल्या अतिरेक्यांनी अनेक डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवत बंदुकांच्या फैरी झाडणे सुरूच ठेवले होते. इतक्यात अंजलीसोबतच्या एका महिला रुग्णाला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या. आता मात्र खरोखरच मोठा बाका प्रसंग होता. महिलेची प्रसूती कोणत्याही वेळी होणार होती. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास तिला आणि तिच्या पोटातील बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे अंजली आणि तिच्या सोबतच्या काही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला लेबर रूममध्ये नेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मजल्यावरील एका लेबर रूममध्ये केवळ एका ट्यूब लाईटच्या प्रकाशामध्ये अंजली, काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी मिळून या गर्भारशी महिलेची सुखरूप सुटका केली.

कामा हॉस्पिटलमधे मृत्यूने थैमान घातले असतानाच एकीकडे मात्र अंजली, आणि तिच्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी काहीही करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा जणू विडाच उचलला होता. यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही हे लोक मागेपुढे पहात नव्हते. सर्व रुग्णांसाठी मानवी ढाल बनून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी हे सर्वच जण चोख पार पाडत होते. रुग्णांचा थांगपत्ता अतिरेक्यांना लागू नये यासाठी या कर्मचाऱ्यांनी विविध विभागांमधले दिवे बंद करून टाकले, या विभागांकडे येणारे दरवाजे बंद केले, आणि शक्य तितक्या रुग्णांना वॉशरूम्स पासून पँट्री पर्यंत जमेल तितक्या ठिकाणी दडवून ठेवले. गोळीबाराचा आवाज, एक तासाभराचा अवधी उलटून गेल्यानंतरही शांत होत नव्हता. त्यावरून अतिरेकी अजूनही हॉस्पिटलमधेच असल्याचे समजून येत होते. त्यानंतर मात्र काही काळानंतर गोळीबाराचे आवाज थांबले. कसाब आणि खान या दोघांनी हॉस्पिटलमधून पलायन केले, पण जाण्यापूर्वी त्यांनी केलेल्या गोळीबारामुळे आणि फेकलेल्या हँड ग्रेनेड्समुले अनेक पोलीसकर्मी आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी जबर जखमी झाले होते. अनेकांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमधील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आणण्यात बारा तासांचा कालावधी उलटून गेला होता.

हळू हळू सर्व परिस्थिती जरी पूर्वपदावर आली असली, तरी त्यावेळी अंजली आणि तिच्यासमवेत हॉस्पिटलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आजही त्या भीषण रात्रीच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांनी अनुभवलेल्या विलक्षण परिस्थतीच्या आणि गोळीबाराच्या आठवणींमुळे पुढे किती तरी काळ हे लोक अतिशय अस्वस्थ होत असत. अनेकांनी तर आपली रात्रीची शांत झोपही गमावली होती. त्या पायी अनेकांना सायकोलॉजिकल काउन्सेलरची मदतही घ्यावी लागली होती. या घटनेनंतर अंजली आणि इतर काही कर्मचारी काही काळ मानसिक दृष्ट्या अतिशय अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्यावर जास्त कामाचा दबाव पडणार नाही याची काळजी प्रत्येकजण घेत होता. सर्वांची मनस्थिती पूर्वपदावर येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला.

सुमारे महिन्याभराचा काळ उलटून गेल्यानंतर अंजलीला आर्थर रोड कारागृहामध्ये येण्यास सांगितले गेले. दहशतवादी हल्ले झाले, त्यावेळी कामा रुग्णालयामध्ये अंधाधुंद गोळीबार करीत असलेल्या अतिरेक्यांपैकी एकाची, म्हणजेच कसाबची ओळख पटविण्यासाठी तिला बोलाविले गेले होते. मुंबईमध्ये दाखल झालेल्या अतिरेक्यांपैकी केवळ कसाबच पोलिसांच्या तावडीत जिंवत सापडला होता. त्याची ओळख पटविण्यासाठी अंजलीला बोलावणे आले, आणि एका क्षणात तिच्या डोळ्यांसमोर ती काळरात्र पुन्हा एकदा उभी राहिली. कसाबची ओळख पटवून कामा हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांपैकी तो एक असल्याची साक्ष अंजलीला द्यायची होती. तिच्या मनावर असह्य दडपण होते. पण पोलिसांनी तिची समजूत काढून तिला साक्ष देण्यास राजी केले. अंजलीने कसाबला ओळखले, त्यावेळी कसाबच्या चेहऱ्यावर केवळ कुत्सित हसू होते. कसाबच्या चेहऱ्यावरले बेदरकार भाव पाहून अंजलीच्या मनामध्ये चीड उत्पन्न झालीच, पण त्याही पेक्षा जास्त तिचे मन, तिच्या आणि तिच्या परिवाराच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी व्याकूळ होत होते.

अखेरीस परिवाराचा विरोध असतानाही, कसाब विरोधात साक्ष देण्यास अंजली कोर्टात उभी राहिली. आपल्या गणवेशामध्ये उपस्थित असलेल्या अंजलीने अतिशय आत्मविश्वासाने, कोणत्याही दडपणाला बळी न पडता कसाबविरुद्ध साक्ष दिली. साक्ष संपवून जेव्हा अंजली कोर्टाच्या बाहेर आली, तेव्हा तिच्या धाडसाचे कौतुक अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील तिला ‘सॅल्युट’ करून केले. या घटनेला आता दहा वर्षांचा काळ लोटला आहे, पण ही सर्व घटना आजही अंजलीच्या मनामध्ये ताजी आहे. गेल्या काही काळामध्ये कामा हॉस्पिटलमध्येही आता सुरेक्षेची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या सभोवार सहज पार करता येणार नाही अशी उंच बाऊंडरी वॉल, हॉस्पिटलच्या आत आणि आसपासच्या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरांचा जागता पहारा अश्या अनेक प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेने कामा हॉस्पिटल सुसज्ज आहे.

Leave a Comment