ब्रिटनमध्ये लवकरच होणार सर्वात मोठ्याने घोरणाऱ्या मंडळींची स्पर्धा !


रात्रीची शांत झोप आपल्या दिवसभराचा थकवा दूर करणारी, शरीराला आणि मनाला आवश्यक ती विश्रांती देणारी असते. त्यामुळे ही झोप कुठल्याही त्रासाविना आपल्याला घेता यावी असे प्रत्येकालाच वाटत असते. पण घरी किंवा रात्रीच्या प्रवासामध्ये सोबत असणारऱ्या मंडळींपैकी जर कोणी मोठमोठ्याने घोरणारे असेल, तर मात्र झोपेचे खोबरे झालेच म्हणून समजावे. अनेकदा या मंडळींना झोपेतून जाग आली, तर यांचे घोरणे तात्पुरते थांबते खरे, पण लवकरच ही मंडळी पुन्हा निद्राधीन होतात आणि पुनश्च त्यांचे घोरणे सुरु होते. आपण घोरत आहोत हे या मंडळींना समजत नसल्यामुळे आपल्यामुळे इतरांची झोपमोड होत आहे याची या मंडळींना गंधवार्ताही नसते. मात्र अश्या मंडळींसाठी, त्यांच्या घोरण्याच्या सवयीमुळे प्रसिध्द होण्याची संधी लवकरच ब्रिटनमध्ये प्रसारित होणाऱ्या शोमध्ये दिली जाणार आहे.

ब्रिटनमधील एक प्रोडक्शन कंपनी सध्या जोरदार आवाजात घोरणाऱ्या महाभागांच्या शोधात असून, या स्पर्धात्मक शोचे नाव ‘ब्रिटन्स लाऊडेस्ट स्नोरर्स’ (Britain’s loudest snorers) असे असणार आहे. या स्पर्धात्मक शोचे नेमके स्वरूप काय असणार आहे हे अद्याप स्पष्ट केले गेले नसले, तरी घोरणारी व्यक्ती, ती किती मोठ्याने घोरते, त्याचे इतरांवर काय परिणाम होतात अश्या प्रकारच्या चर्चा या शोमध्ये केल्या जाव्यात असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ‘फायरक्रॅकर फिल्म्स’च्या वतीने या शोची निर्मिती केली जाणार असून, हा शो कोणत्या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे, याबद्दल अद्याप निश्चित निर्णय व्हायचा आहे. या शोमध्ये भाग घेऊ इच्छिणारे स्पर्धक अठरा वर्षांवरील असणे आवश्यक असून, या शोचे चित्रीकरण लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment